सध्या सगळीकडे 'भूल भूलैय्या ३'ची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने अल्पावधीत १५० कोटींहून जास्त कमाई केलीय. 'भूल भूलैय्या ३'समोर मल्टिस्टारर 'सिंघम अगेन'चं तगडं आव्हान होतं. परंतु माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर 'भूल भूलैय्या ३'ने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. या सिनेमात पहिल्या भागात झळकलेली विद्या बालनने पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत कमबॅक केलं. एका मुलाखतीत 'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागातील मंजुलिकाची भूमिका लोकप्रिय होऊनही विद्याला एकही पुरस्कार मिळाला नाही. यावर अभिनेत्रीने भाष्य केलंय.
मंजुलिकासाठी पुरस्कार न मिळण्यावर विद्या बालन म्हणाली
'भूल भूलैय्या'चा पहिला भाग चांगलाच गाजला. अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल, मनोज जोशी यांची या सिनेमात प्रमुख भूमिका होती. या सिनेमात विद्या बालनने साकारलेली मंजुलिकाची भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या भूमिकेसाठी पुरस्कार न मिळण्यावर विद्या बालन म्हणाली- "भूल भूलैय्यानंतर मला इश्किया ऑफर झाला. मला लोकांनी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं. मला मंजुलिकासाठी पुरस्कार मिळाला नाही तर ठीक आहे. पण त्यानंतर मला सलग चार वर्ष बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला."
विद्या बालनला 'भूल भूलैय्या'नंतर पुढील वर्षी 'पा', 'इश्किया', 'द डर्टी पिक्चर' आणि 'कहानी' या चार सिनेमांसाठी सलग सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. सध्या विद्या बालन कार्तिक आर्यनसोबत 'भूल भूलैय्या ३'मध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत पुन्हा परतली आहे. विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' हा सिनेमा गेल्या अनेक वर्षानंतर सुपरहिट सिनेमा झालाय. विद्या बालनसोबतच या सिनेमात तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. अनीस बाझमींनी 'भूल भूलैय्या 3'चं दिग्दर्शन केलंय.