दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आरती अग्रवाल हिने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली होती. अभिनेत्रीचा चिरंजिवीसोबतचा इंद्रा द टायगर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २०१५ साली या अभिनेत्रीचे निधन झाल्याचे समजल्यावर सगळ्यांना धक्का बसला होता. स्लिम होण्याच्या नादात आरती अग्रवालने जीव गमावला आहे.
आरती अगरवालचा लिपोसक्शन नावाच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. या शस्त्रक्रियेसाठी ती अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या प्रायव्हेट रुग्णालयात दाखल झाली होती. शस्त्रक्रियेनंतर काही तासात तिची प्रकृती बिघडली होती. हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अवघ्या ३१ व्या वर्षी या आरती अग्रवालने जगाला अलविदा केला. तिने अमेरिकेत ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हैदराबादमधल्या डॉक्टरांकडे या शस्त्रक्रियेबाबत विचारले होते. ही शस्त्रक्रिया तुझ्या जीवावर बेतू शकते असे सांगत या डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. ही शस्त्रक्रिया करू नकोस तुझ्या त्वचेखाली चरबी नाही आहे, असे या डॉक्टरांनी आरतीला सांगितले होते.
आरती अग्रवालला चित्रपट मिळणे झाले होते कठीण
आरती अग्रवालने सिनेइंडस्ट्रीत टीकायचे असेल तर आपल्याला बारीक व्हावे लागेल असे मनाशी ठरवले होते. मात्र यासाठी तिने व्यायामाचा कठीण मार्ग निवडण्याऐवजी शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला,असे सांगितले जाते. जाड असल्यामुळे आरतीला चित्रपट मिळणे कमी झाले होते, यामुळे ती तणावाखाली होती. २००८ साली तिला फक्त ४ चित्रपट मिळाले होते. त्यामुळे आरतीने शरीरातील अतिरिक्त चरबी हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला शस्त्रक्रिया खूप महागात पडली.