'द केरळ स्टोरी' सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करणारा 'पठाण' नंतरचा हा दुसरा हिंदी सिनेमा ठरला आहे. अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवून त्यावर बंदीची मागणीही केली होती. मात्र त्यानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आकर्षित करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी आणि तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स मालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार देऊनही 'द केरळ स्टोरी' सिनेमाची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाटपणे धावते आहे. सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या चर्चेत आहे. सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघून अदा शर्मा भारावली आहे तिने प्रेक्षकांचे आभार मानत विशेष पोस्ट शेअर केली आहे.
अदा शर्माने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट लिहिले आहे ज्यात तिने चित्रपटला 'एक मोठा ब्लॉकबस्टर' बनवल्याबद्दल भारतीय प्रेक्षकांचं मनापासून आभार मानलं आहेत. अदाने लिहिले, ''भारतीय प्रेक्षकांचे मनापासून आभार… गेल्या काही दिवसांत मी चित्रपटाला शुभेच्छा देणारे अनेक पोस्टर्स, होर्डिंग्ज पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे खास चित्रपट पाहण्यासाठी बंगालहून आसामपर्यंत प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. ‘द केरळ स्टोरी’ आता प्रेक्षकांचा सिनेमा असल्याने याच्या यशात मला सहभागी करुन घेण्यासाठी धन्यवाद..''
अदा शर्मा पुढे लिहितात, 'केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही 'द केरळ स्टोरी'ला उदंड प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून आनंद झाला. दोन दिवसांपूर्वी हा सिनेमा ब्रिटनमध्ये रिलीज झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे मेसेज येत आहेत. यामुळे मी खरंच आनंदी आहे.”
याआधी अदाने 'कमांडो 2' आणि 'कमांडो 3' सारख्या चित्रपटात काम केले आहे. पण 'द केरळ स्टोरी'मुळे ती प्रकाशझोतात आली.