Join us

Exclusive : 'द केरळ स्टोरी' पाहिल्यावर मुस्लिम मित्रांची काय होती रिअ‍ॅक्शन? अदा शर्मा म्हणाली, "त्यांनी सिनेमा..."

By ऋचा वझे | Published: May 31, 2023 4:30 PM

'द केरळ स्टोरी' हा सध्याचा चर्चेतील सिनेमा. फिल्मला मिळालेला प्रतिसाद पाहता अभिनेत्री अदा शर्माशी साधलेला संवाद...

सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सध्याचा चर्चेतील सिनेमा. यात अभिनेत्री अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. यानिमित्त तिने लोकमतशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

>>ऋचा वझे

सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाला?

- असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं आहे. 1920 हा हॉरर सिनेमा केल्यानंतर मला आज हे यश मिळालं आहे. त्यामुळे नक्कीच आयुष्य बदलून गेलं आहे. अनेकांना माझ्यासोबत काम करायचं आहे लोक मला ओळखायला लागले आहेत. माझी या सिनेमासाठी निवड झाली हे माझं भाग्यच आहे असं मला वाटतं. मी माझं हे यश पूर्ण देशासोबत शेअर करतीये याचा मला आनंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिनेमाला पसंती मिळत आहे हे बघून खूप छान वाटत आहे. 

'प्रोपोगंडा सिनेमा' अशी टीका जेव्हा होते तेव्हा काय वाटतं? 

- खरं सांगायचं तर मी असा विचारच केला नव्हता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रमोशनवेळी मी अनेकांकडून हा शब्द ऐकला. पण मला हे फारच विचित्र वाटतंय की लोक चित्रपट न पाहताच प्रोपोगंडा, प्रोपोगंडा असं म्हणत आहेत. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला जे वाटतं तो ते बोलू शकतो, मत मांडू शकतो. पण तुम्ही इंटरनेटवर जाऊन स्वत: सर्च करु शकता की कसं महिलांचं ब्रेनवॉश झालं आहे फक्त भारतच नाही तर युरोप, फ्रान्स अशा अनेक देशांतून महिला ISIS मध्ये सामील झाल्या आहेत. जे प्रोपगंडा म्हणत आहेत त्यांनी सिनेमाच पाहिलेला नाही त्यामुळे मी त्यांना आणखी काय बोलणार.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुझ्या मुस्लिम मित्र मैत्रिणींकडून काय प्रतिक्रिया आल्या?

हा सिनेमा कोणत्या धर्माला टार्गेट करणारा नाही. दहशतवादी ग्रुप एखाद्या धर्माचा दुरुपयोग करुन महिलांचं ब्रेनवॉश करत आहे. माझे सर्व मित्रमैत्रिणी सिनेमा पाहायला गेले. त्यांचीही हीच प्रतिक्रिया होती की हा सिनेमा स्पष्टपणे दहशतवादाशी निगडीत आहे. मला असं वाटतं की सिनेमातून अगदी स्पष्ट संदेश देण्यात आलाय पण जर कोणी चूक काढायचीच असं ठरवलंच असेल, दुसऱ्यांवर खालच्या पातळीची टीकाच करायची असेल तर ती त्यांची चॉईस आहे. माझ्या मित्रांना सिनेमा पाहिल्यानंतर काहीच इश्यू वाटला नाही. 

तुझे मराठी कवितांचे रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. इतकं छान मराठी बोलायला कुठे शिकलीस?

आमच्या शाळेत हिंदीपेक्षा मराठी भाषा जास्त डिटेलमध्ये शिकवली गेली. मी घरीही स्टाफसोबत मराठीत बोलते. माझे अनेक मित्रमैत्रिणी महाराष्ट्रीयन आहेत. मी शिवाजी पार्कमध्ये उदय देशपांडे सरांकडून मल्लखांबचं प्रशिक्षण घेतलं आहे. ते महाराष्ट्रीयन आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर मराठीचा प्रभाव आहे.

तू मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स शिकली आहेस, इतर मुलींना काय आवाहन करशील?

प्रत्येक मुलीने स्ट्रॉंग राहण्यासाठी एखादा तरी शारिरीक मैदानी खेळ शिकणं गरजेचं आहे. मल्लखांब शिकल्याने मला खूप फरक पडला. त्यामुळे तुमच्या पूर्ण शरिराचा व्यायाम होतो. अनेक मुली सध्या पोल मल्लखांब, रोप मल्लखांब शिकत आहेत. हे तुमच्या शरिरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उपयोगी आहे. याने तुम्हाला शिस्त लागण्यासही मदत होते.

भविष्यात तुला मराठी सिनेमात काम करायला आवडेल का ?

मला कालच एका मराठी सिनेमाची ऑफर आली आहे. सध्या इतरही अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या आहेत. जर सगळं जुळून आलं तर मराठी चित्रपटातही मी काम करेल हे नक्की.

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडमुलाखतलव्ह जिहाददहशतवाद