Adah Sharma : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमातील मुख्य अभिनेत्री अदा शर्मा सध्या बरीच चर्चेत आहे. मुंबईकर अदा शर्माचंमराठीशी खास कनेक्शन आहे. अदाला उत्तम मराठी बोलता येतं. इतकंच नाही तर ती तिच्या इन्स्टाग्रामवर आपण लहानपणी ऐकलेल्या मराठी कविता म्हणतानाचा व्हिडिओ शेअर करते. अदाच्या या व्हिडिओवर मराठी चाहते तर खूपच खूश झालेत. तिचं हे मराठी कनेक्शन नेमकं आहे तरी काय याचंही उत्तर तिने दिलं आहे.
अभिनेत्री अदा शर्मा 1920 या हॉरर फिल्ममुळे प्रसिद्ध झाली होती. तिची सिनेमातील भूमिका प्रेक्षकांनी खूप पसंत केली. आता अदा 'द केरळ स्टोरी'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. अदा सोशल मीडियावर भलतीच अॅक्टिव्ह असते. मराठीतील आपण लहानपणी ऐकलेल्या प्रसिद्ध कविता आहेत जसे की 'एक होती इडली, ती होती चिडली','अटक मटक चवळी चटक' अशा काही विनोदी कविता म्हणतानाचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत.
अदाच्या या व्हिडिओंवर मराठी प्रेक्षक तर भलतेच खूश झालेत. शिवाय अदाचे उच्चारही अगदी स्पष्ट आहेत. 'इतकी छान मराठी कशी बोलतेस?' असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला. तेव्हा शाळेत मराठी शिकल्याचं अदाने सांगितलं. सध्या ती 'द केरळ स्टोरी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाला अनेकांचा प्रतिसादही मिळतोय तर काही जणांनी सिनेमाला कडाडून विरोधही केलाय. 'काश्मीर फाईल्स' प्रमाणेच सिनेमा चर्चेत आलाय.