बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या त्याच्या एक्स हसबंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यामुळे चर्चेत येत आहे. आदिलने नुकतंच बिग बॉस १२ फेम सोमी खान सोबत निकाह केला आहे. मात्र, त्यांच्या निकाहची बातमी कानावर पडल्यानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, आता आदिलनेही राखीला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
अलिकडेच आदिलने 'बॉलिवूड बलल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने राखीवर अनेक आरोप केले असून काही दावेदेखील केले आहेत. आदिलने घटस्फोट न देताच दुसरं लग्न केल्याचा आरोप राखीने केला होता. त्यावर आता त्याने पलटवार केला आहे.
काय म्हणाला आदिल?
"तिने स्वत: ५ लग्न केले असून कोणालाही घटस्फोट दिलेला नाही. आमचं लग्न झालं होतं? बोलायला गेले तर काहीही बोलू शकतो. पण, प्रत्यक्षात असं काहीही नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मी मुस्लीम आहे. आणि, माझा इस्लाम धर्म, आमचा कायदा, माझं संविधान मला सांगतं की मी लग्न करु शकतो आणि मी ते केलं. मी एक सुशिक्षित आहे त्यामुळे मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही," असं आदिल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला कायदा चांगलाच माहित आहे. ज्यावेळी माझ्यासोबत हा किस्सा घडला. त्यामुळे कायद्याचे नियम माझे तोंडपाठ झाले आहेत. मी याविषयी अभ्यास केलाय आणि माझ्याकडे कायद्याची पुस्तकं सुद्धा आहेत. जर कायद्यामध्येच याची परवानगी असेल तर मी काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि, मुळात गैरमार्गाने तिनेच ५ लग्न केले आहेत. या उपर तिने घटस्फोटही घेतलेला नाही. सध्या ती फरार आहे. ती भारतात परतली की तिला तुरुंगात जावं लागणार आहे."
दरम्यान, अलिकडेच आदिलने बिग बॉस फेम सोमी खान सोबत लग्न केलं. त्याने त्यांच्या निकाहचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राखीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात आदिलने घटस्फोट न देताच दुसरा संसार थाटला असा आरोप राखीने केला आहे.