1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘83’ या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास रणवीरने या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. शिवाय चित्रपटाची स्टारकास्ट निवडण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
आदिनाथ कोठारेने आजवर अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. त्याने एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदिनाथच्या चाहत्यांसाठी एक खूपच चांगली बातमी आहे. आता आदिनाथ प्रेक्षकांना एका बॉलिवूडच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘83’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कोणता अभिनेता कोणत्या क्रिकेटरच्या भूमिकेत झळकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ‘83’ या चित्रपटात आता एका मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. आदिनाथ या चित्रपटात पूर्व भारतीय क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथ लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे.
83 या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात मराठी अभिनेता चिराग पाटील त्याचे वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये सिनेमातील कलाकारांना हे महान क्रिकेटर्स क्रिकेटचे प्रशिक्षण देणार आहेत.