दिग्दर्शक ओम राऊत (OmRaut) 'आदिपुरुष' (Adipurush) या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमामुळे खूपच ट्रोल होतोय. रामायणावर अशा पद्धतीचा सिनेमा बनवलाच कसा म्हणत त्याच्यावर टीका होत आहे. अतिशय वाईट व्हीएफएक्स, रामायण कथेची अक्षरश: मोडतोड, हनुमानाच्या तोंडी छपरी संवाद आणि रावणाचा लुक अशा अनेक कारणांवरुन सिनेमा प्रचंड ट्रोल होतोय. आता ओम राऊतने याआधी हनुमानावरुन केलेलं एक जुनं ट्वीट व्हायरल होतोय. ते ट्वीट वाचून नेटकऱ्यांचा संताप झालाय.
ओम राऊतने 4 एप्रिल 2015 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशीच एक ट्वीट केलं होतं. त्यात त्याने लिहिलं, 'आमच्या इमारतीतीतल लोकांना काय वाटतं...हनुमानजी बहिरे होते का? हनुमान जयंतीला इतक्या जोरजोरात म्हणजे कर्कश्श आवाजात गाणी लावली आहेत. तेही सगळी अनावश्यक गाणी आहेत.'
ओम राऊतने ट्रोलिंगनंतर हे ट्वीट डिलीट केले आहे मात्र त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. हे ट्वीट वाचून नेटकऱ्यांचा संतापच झाला आहे. नेटकरी त्याला चांगलेच खडेबोल सुनावत आहेत. 'हिंदू देवदेवतांबद्दल असे विचार असतील तर त्याच्याकडून चांगल्या सिनेमाची अपेक्षा कशी करु शकतो',' धर्माला व्यवसाय बनवणे बंद करा','हा प्रत्येक वेळी आपले रंग आणि विधान बदलतो' अशा शब्दात ओम राऊतवर टीका होत आहे.
दरम्यान आदिपुरुष सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रचंड ट्रोलिंगनंतरही सिनेमाने पहिल्या दिवशीच ६० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दोनच दिवसात १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. आता मात्र सिनेमाच्या कमाईत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.