प्रभास, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. पण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला होता. सैफ अली खानने या चित्रपटाच्या बाबतीत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याला टीकेचा धनी व्हावे लागले होते. अखेर सैफने आपली चूक मान्य करत यावर माफी मागितली होती. सैफने एका मुलाखतीत आदिपुरूष चित्रपटातील त्याच्या रावणाच्या भूमिकेबाबत सांगितले होते. पण त्याने रावणाच्या भूमिकेबाबत केलेलं वक्तव्य अनेकांना आवडलं नव्हतं. सामान्यांसोबतच अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. या वादामुळे सोशल मीडियावर हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र सैफने माफी मागत त्याचे वक्तव्य मागे घेतले होते.
या वादानंतर आता आदिपुरुष या चित्रपटाचे लेखक मनोज मुंटशीर यांनी या चित्रपटात कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेली नाही. तसेच लोकांना आक्षेपार्ह वाटेल असे या चित्रपटात काहीही नाही असे म्हटले आहे. मीड डे ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे की, रावण एक राजा म्हणून कसा होता. तसेच त्याचे विविध पैलू या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
काय म्हणाला होता सैफ? मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले होते. ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बॉयकॉट आदिपुरूष, वेकअप ओमराऊत असे हॅशटॅग ट्रेंड झाले होते. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे.