अदितीने सन २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली 6’ मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती. २०१८ मध्ये आलेला ‘दासदेव’ हा तिचा बॉलिवूडमधला अखेरचा चित्रपट होता. सध्या ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम करताना दिसत आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तिने आतापर्यंत पद्मावत, रॉकस्टार, मर्डर ३, भूमी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
आदिती राव हैदरीने नुकतीच Feet Up with the Stars Season 2 या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने एक सांगितलेली गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने या कार्यक्रमात गप्पा मारण्याच्या ओघात सांगितले की, तिने तिचे नाव गुगुलवर शोधणेच आता बंद केले आहे आणि तिच्या या निर्णयामागे एक खास कारण आहे. तिने नाव गुगलला शोधल्यानंतर तिचे जे फोटो पाहायला मिळतात, ते फोटो पाहिल्यावर तिला प्रचंड राग येत असल्याने तिने हे ठरवले आहे.
आदितीने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ये साली जिंदगी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटासाठी तिने बॅकलेस फोटोशूट केले होते. पण तिचे नाव गुगलवर टाकल्यावर तेच फोटो पाहायला मिळतात असे तिचे म्हणणे आहे.
आदितीला Feet Up with the Stars Season 2 या कार्यक्रमात ये साली जिंदगी या चित्रपटाच्या अनुभवाबाबत विचारले असता तिने सांगितले की, या चित्रपटासाठी मी केलेले बॅकलेस फोटोशूटचे फोटो आजही सोशल मीडियावर पाहायला मिळतात ही गोष्ट मला खटकते. मी एकदा माझे नाव गुगलवर शोधले होते. पण माझ्या याच चित्रपटातील ते फोटो मला सतत दिसत होते. त्यामुळे मी माझे नाव गुगलवर कधीच शोधणार नाही असा निर्णय घेतला.