आदित्य चोप्रा यश राज फिल्म्सची 50 वी वर्षपूर्ती अगदी भव्य स्वरुपात साजरी करण्याची योजना आखत आहेत. या कंपनीने या भव्यदिव्य सोहळ्याची सगळी माहिती अद्याप गोपनीय ठेवली असली तरी हा सोहळा सिनेसृष्टीतील आजवरचा सगळ्यात भव्य सोहळा असेल, हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. 27 सप्टेंबर रोजी दिवंगत यश चोप्रा यांची 88 वी जयंनी आहे. या ख्यातनाम दिग्दर्शकाचा तितकाच यशस्वी मुलगा वायआरएफ प्रोजेक्ट 50 या खास कार्यक्रमाची रुपरेषा या दिवशी सादर करणार आहे. हे जवळपास नक्की आहे की या दिवशी आदित्य चोप्रा हा खास क्षण साजरा करण्यासाठी वायआरएफचा नवा लोगो सादर करणार आहेत. भारतातील एकमेव एकात्मिक स्टुडिओ म्हणजेच यश राज फिल्म्स ही कंपनी म्हणजे युनिव्हर्सल, फॉक्स आणि डिस्ने यासारख्या अमेरिकेतील मोठ्या स्टुडिओची भारतीय आवृत्ती म्हणता येईल.
"वायआरएफ ही संपन्न इतिहासाचा वारसा जपणारी कंपनी आहे. त्यांच्याकडील सुप्रसिद्दा सिनेमांची संख्या तर अतुलनीय आहे. या कंपनीने अनेक कलाकारांना प्रकाशझोतात आणले, त्यांना तयार केले आणि त्यातून भारतीय सिनेमाला अनेक सुपरस्टारही दिले. शिवाय, वायआरएफ हा भारतातील पहिला आणि आजवरचा एकमेव स्टुडिओ आहे. त्यामुळेच या कंपनीला 50 वर्ष पूर्ण होणे हा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीसाठी फार खास क्षण असणार आहे," असे सूत्रांनी सांगितले.
"कंपनीच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त आदि नक्कीच नवा आणि खास लोगो सादर करणार आहे. त्याचे वडील, ख्यातनाम फिल्ममेकर यश चोप्रा यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त या लोगोचे अनावरण केले जाईल. हा खरच फार खास क्षण असणार आहे. 50 व्या वर्षपूर्तीचा 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सोहळयाचा आरंभ या नव्या लोगोच्या अनावरणातून होईल. आमच्याकडे अशीही माहिती आहे की हा लोगो भारतातील सर्व अधिकृत भाषांमध्ये सादर केला जाणार आहे," असे सूत्रांनी सांगितले.
लोगो अशा भव्य स्वरुपावर सादर करण्यामागचे कारणही सूत्रांनी स्पष्ट केले. "वायआरएफने गेली 50 वर्षे भारतभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही काही सामान्य बाब नाही. भाषेचा अडसर दूर सारत त्यांच्या सिनेमांनी संपूर्ण भारताचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे, जर ते 50 व्या वर्षपूर्तीनिमित्त नवा लोगो सादर करणार असतील तर ती प्रोजेक्ट 50 ची सुरुवात असणार, हे नक्की!" असे सूत्रांनी सांगितले.
या सूत्रांनी पुढे असेही सांगितले, "हा लोगो भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये सादर केला जाणार आहे, अशीही चर्चा आहे. हे खरे असेल तर वायआरएफच्या सिनेमांवर प्रेम करणाऱ्या सर्व राज्यांमधील प्रेक्षकांचे आभार मानण्याचा हा फारच चांगला मार्ग आहे. त्यांचे सिनेमे, त्यांच्या कलाकारांनी भारतातील सिनेसंस्कृतीला आकार दिला आहे, तिची जडणघडण केली आहे आणि अशा प्रकारे सादरीकरण केल्याने वायआरएफने मनापासून धन्यवाद म्हटल्यासारखे वाटेल."