Join us

आदित्य चोप्रा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील कामगारांचे लसीकरण करणार, मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 12:59 PM

“सध्या सिनेउद्योग मोठ्या अनिश्चिततेमधून मार्गक्रमणा करत असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रोजंदारीवर जगणाऱ्या हजारो कामगारांना कामावर रुजू होऊन स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करणे शक्य होईल.

संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना आदित्य चोप्रा याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या व्हायआरएफच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोविड – 19 च्या 60,000 लशींच्या खरेदीची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. या कामगारांचे लसीकरण करण्यासाठी लागणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी व्हायआरएफने सादर केलेल्या विनंती पत्रात दर्शविण्यात आली आहे.   

व्हायआरएफच्या वतीने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ला पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “सध्या सिनेउद्योग मोठ्या अनिश्चिततेमधून मार्गक्रमणा करत असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रोजंदारीवर जगणाऱ्या हजारो कामगारांना कामावर रुजू होऊन स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करणे शक्य होईल.

यश राज फिल्म्सने यश चोप्रा फाउंडेशनमार्फत या दिशेने मदतीचा हात पुढे केला आहे. सुमारे 30 हजार नोंदणीकृत कामगारांकरिता कोविड -19 लस विकत घेण्याची परवानगी आम्हाला द्यावी या आशयाचे पत्र आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. सिनेउद्योगाशी संबंधित मुंबईतील फेडरेशनच्या या सदस्यांना लवकरात लवकर लस मिळाली पाहिजे.”

या पत्रात पुढे लिहिण्यात आले आहे की, “यश चोप्रा फाउंडेशन’च्या वतीने कामगारांकरिता लागणाऱ्या लसीकरणाचा सर्व खर्च उचलण्यात येणार आहे. या खर्चात जनजागृती करणे, कामगारांची ने-आण तसेच लसीकरण कार्यक्रमाकरिता पायाभूत सुविधा उभारण्यात येईल. आम्हाला आशा वाटते की, आमची  विनंती स्वीकारली जाईल. त्यामुळे आमचे सदस्य सुरक्षित राहतील आणि त्यांना कामावर लवकरात लवकर रुजू होता येईल.”

टॅग्स :आदित्य चोप्रा कोरोनाची लस