प्रसिद्ध गायक म्हणून अदनान सामी (Adnan Sami) आज संपूर्ण देशात ओळखला जातो. १९८६ मध्ये अदनान यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरुवात केली. अदनान सामी यांनी उत्तम आवाजाच्या जोरावर कलाविश्वात नाव, यश, प्रसिद्ध असं बरंच काही मिळवलं. मात्र, वैवाहिक जीवनात त्यांना फारसं यश मिळालं नाही. पर्सनल आयुष्यात त्यांना अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. अदनान सामी यांचे तीन लग्न झाले आहेत. यात पहिल्या दोन पत्नींपासून ते कायदेशीरित्या विभक्त झाले आणि आता तिसऱ्या पत्नीसोबत संसार थाटला आहे. यामध्येच त्यांची पहिली पत्नी, अभिनेत्री जेबा बख्तियार (Zeba Bakhtiar) हिने अदनान सामींसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. तसंच घटस्फोट घेण्यामागील कारणही सांगितलं.
जवळपास २७ वर्षानंतर जेबाने अदनान सामीसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य केलं. तसंच त्यांचा घटस्फोट का झाला यामागचं कारणही सांगितलं. अदनान आणि जेबा १९९३ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले. घटस्फोट झाल्यानंतर जेबाने तिच्या मुलाचा सांभाळ केला. अलिकडेच जेबाने आमना हैदर इसानीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या नात्याविषयी आणि करिअरविषयी भाष्य केलं.
"ज्यावेळी माझं अदनान सोबत लग्न झालं त्यावेळी मी काही सिनेमांचं शूटिंग करत होते. त्यावेळी मला अभिनय क्षेत्रात करिअर करण्यात रस नव्हता. मला लेखणाची आवड होती. आणि, मला प्रोड्युसर व्हायचं होतं. त्यामुळे मी अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय सुद्धा नव्हते. मी अदनानसोबत लग्न केलं आणि अजानचा जन्म झाला. अदनानसोबत असलेल्या नात्याला मी पूर्णपणे माझा वेळ देत होते. पण, ज्यावेळी नात्यात मतभेद सुरु झाले त्यावेळी मी माझं सगळं लक्ष प्रोडक्शनकडे वळवलं. आणि, दुसरे प्रोजेक्ट्स करणं सुरु केलं", असं जेबा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "लग्नानंतर मी माझं मानसिक संतुलन गमावलं होतं. मला वेड लागायची पाळी आली होती. पण, तरी मी माझं लक्ष करिअरवर केंद्रित केलं होतं. कारण, मला स्पर्धेत राहायचं होतं. मी त्या काळात अनेक संकटांचा सामना केला. पण, आज अजान माझ्यासोबत आहे याचाच मला आनंद आहे. अजानच्या कस्टडीसाठी मी १८ महिने संघर्ष केला. त्या काळात मी कोणतंच कामही करत नव्हते. पण, मी स्वत:साठी काम केलं पाहिजे असं माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितलं."