मुंबई - अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. रविवारी भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. भारतात दाखल झालेल्या या विमानात हिंदू शीख आणि अफगाणी नागरिकही आले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता, अभिनेता कमाल खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोरंजन विश्वातूनही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर आपल्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यातच, आता नेहमीच वादाग्रस्त विधान करणाऱ्या केआरके म्हणजे कमाल रशीद खानने मत मांडलं आहे. केआरकेनं ट्विटरवरुन अफगाणिस्तानच्या नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तेथील मुस्लिमांबद्दल चिंता जाहीर केली आहे. तसेच, भारतातील मुस्लीम सर्वात सुरक्षीत असून भारत हा देश मुस्लीमांसाठी सर्वात चांगला असल्याचं कमाल यांनी म्हटलं आहे.
अफगाणिस्तानमधील अनेक मुस्लीम आपल्या सुरक्षेसाठी भारतात येत आहेत. त्यामुळेच, भारत हा मुस्लिमांसाठी सर्वात सुरक्षित देश आहे, हे माझं विधान 100 टक्के खरं ठरलंय, असेही खानने म्हटले आहे.
अफगाणिस्तानी नागरिकही भारतात आले
गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर रविवारी वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली. या 168 जणांमध्ये अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही हजर होते. एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी नरेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी, अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, खासदार खालसा यांना अश्रू अनावर झाले. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलं चाललंय. सगळं शुन्यावर यायलंय, अशी माहिती देताना त्यांना हुंदका आवरता आला नाही.