14 महिन्यांचा असताना तो कॅमे-यापुढे उभा झाला आणि बघता बघता बॉलिवूडचा हिरो झाला. हिरो म्हणून त्याचे करिअर अपयशी ठरले, हे खरे. पण हो, त्याचा चेहरा मात्र प्रेक्षकांच्या काळजावर कोरला गेला. आम्ही बोलतोय ते अभिनेता आफताब शिवदासानी याच्याबद्दल. आज आफताब आठवण्याचे कारण म्हणजे, त्याचा व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ.सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाउन झाला आहे. या काळात आफताबने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या टुथपेस्टच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ त्याच्या एका चाहातीने त्याला टॅग करून शेअर केला. तो व्हिडिओ बघून आफताब कमालीचा भावूक झाला.
केवळ 14 महिन्यांचा असताना आफताब एका बेबी फूडच्या जाहिरातीत झळकला होता. यानंतर बालकलाकाराच्या रुपात तो अनेक जाहिरातींमध्य दिसला. 1987 साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातून तो पहिल्यांदा बालकलाकाराच्या रुपात मोठ्या पडद्यावर झळकला होता. त्यानंतर 1988 साली आलेल्या ‘शहंशाह’ या सिनेमात त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. अव्वल नंबर, चालबाज आणि इन्सानियत या सिनेमांमध्ये तो बालकलाकाराच्या रुपात दिसला.
आफताबने वयाच्या 19 व्या वर्षी रामगोपाल वर्मांच्या ‘मस्त’ या सिनेमातून हीरोच्या रुपात पदार्पण केले होते. त्याच्यासोबत उर्मिला मातोंडकर मेन लीडमध्ये होती. सिनेमा हिट ठरला आणि यासाठी आफताबला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरचा अवॉर्ड मिळाला.
त्यानंतर आफताब 2001 साली आलेल्या विक्रम भट यांच्या ‘कसूर’ या सिनेमात झळकला. त्याच्या अपोझिट या सिनेमात लीसा रे होती. आफताबने या सिनेमात निगेटिव्ह रोल साकारला होता. हा सिनेमा म्युझिकल हिट ठरला. मस्त, कसूर आणि हंगामा हे सिनेमे वगळता आफताबचे इतर सिनेमे फारशी कमाल दाखवू शकले नाहीत.