सलमान खान शब्दाला जागणार! शेराच्या ‘टायगर’ला लॉन्च करणार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 07:23 PM2018-07-04T19:23:43+5:302018-07-04T19:28:40+5:30
सलमान खान शब्दाचा पक्का आहे. दिलेले वचन सलमान पाळतोचं पाळतो. काही वर्षांआधी सलमानने आपला बॉडीगार्ड गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा याला असेच एक वचन दिले होते.
सलमान खान शब्दाचा पक्का आहे़ दिलेले वचन सलमान पाळतोचं पाळतो. काही वर्षांआधी सलमानने आपला बॉडीगार्ड गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा याला असेच एक वचन दिले होते. शेरा सुमारे ३० वर्षांपासून सलमानसोबत आहे. सलमान कुठेही जावो, तो अगदी सावलीसारखा त्याच्यासोबत असतो. त्याच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज असतो. प्रसंगी प्राणही द्यायला तयार असलेला शेरा म्हणूनच सलमानच्या खूप जवळ आहे. दोघांमधील बॉन्डिंग आपण अनेकदा पाहिले आहे. याच शेराला भाईजानने एक शब्द दिला होता. तो कुठला तर, शेराच्या मुलगा टायगरला हिरो म्हणून लॉन्च करण्याचा.
असे म्हणतात की, टायगरचा जन्म झाला, त्याचक्षणी सलमानने शेराला हा शब्द दिला होता. त्यावेळी शेराला ही गंमत वाटली होती. बाळाच्या जन्माच्या आनंदात भाई सहज हे बोलून गेला असावा, असेच शेरा इतकी वर्षे समजून चालला होता. पण ती गंमत नव्हती, तर सलमानने दिलेला शब्द होता. आता हा शब्द खरा करून दाखवण्याची वेळ कदाचित आली आहे. होय, ताजी बातमी मानाल तर सलमान लवकरच शेराचा मुलगा टायगरला लॉन्च करणार आहे.
तूर्तास सलमान त्याचा मेहुणा आयुष शर्मा (सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती) याच्या लॉन्चिंगमध्ये बिझी आहे. आयुष शर्माचा ‘लवरात्रि’ लवकरच रिलीज होणार आहे. आयुष शर्मानंतर टायगरचा नंबर आहे. टायगरने या लॉन्चिंगची तयारीही केली आहे. टायगरने सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटादरम्यान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. हाही त्याच्या ट्रेनिंगचा भाग होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरला एका अॅक्शन चित्रपटातून लॉन्च केले जाईल. त्याच्यासोबत एका नव्या हिरोईनला संधी दिली जाईल. आयुषचा डेब्यू जितका ग्रँड राहिल, तितकाच टायगरचाही असेल, हेही सलमानने मनाशी ठरवले आहे. आता भाईजानच्या मदतीने शेराचा टायगर किती यशस्वी ठरतो, ते बघूच.