मोबाइलच्या ५ जी तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडे फेटाळून लावली. शिवाय त्यामुळे न्याययंत्रणेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचे ताशेरे ओढत जुहीला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. आता यावर जुहीने एक व्हिडीओ शेअर करत तिची भूमिका मांडली आहे. आम्ही ५ जीच्या विरोधात नाही, फक्त तुम्ही ते सुरक्षित आहे याची हमी द्या, असे जुहीने म्हटले आहे. (Juhi Chawla against 5G)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत जुही म्हणते, ‘नमस्ते, गेल्या काही दिवसांत इतका गोंधळ, गदारोळ झाला की, मी स्वत:लाही ऐकू शकली नाही. या गोंधळात एक अतिशय महत्त्वपूर्ण संदेश विरला. तो म्हणजे, आम्ही ५ जी विरोधात नाही. उलट आम्ही तर याचे स्वागत करतो. कृपा करून ५ जी आणा. आमची मागणी फक्त एवढीच आहे की, ५ जी सुरक्षित आहे, हे अधिका-यांनी स्पष्ट करावे. कृपा करून तुम्ही सर्टिफाइड करा, यावरचे संशोधन, अभ्यास सगळे काही सार्वजनिक करा, जेणेकरून या तंत्रज्ञानाबद्दलची आमच्या मनातील भीती दूर पळून जाईल आणि आम्ही आरामात झोपू शकू. ही प्रणाली गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाºया बाळांसाठी सुरक्षित असावी, इतकेच आमचे म्हणणे आहे आणि आम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे.’
मोबाइल टॉवरच्या विकिरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका आहे असा दावा अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षापासून करत आहे. तसेच या तंत्रज्ञानाविरोधात तिने कायम विरोधाची भूमिका घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर ५ जी तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने तिची ही याचिका केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत, ती फेटाळून लावली होती.५ जी विरोधातील याचिका जुही चावला हिने केलेली याचिका हा पब्लिसिटी स्टंट आहे. याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? ५ जी तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने ही याचिका फेटाळताना केली होती.