सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. यानंतर महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच रियाची जामिनावर सुटका झाली. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. दिवस रात्र रिया सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यात आता रिया चक्रवर्ती बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
न्यूज नेशनच्या रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीला बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी विचारले आहे. या गोष्टीत किती तथ्य आहे हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र रिया चक्रवर्तीला काही अटींवर जामीन मिळाला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्याची शक्यता कमी आहे.
उच्च न्यायालयाची निरीक्षणे
रिया चक्रवर्तीला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले की, रियाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरुणांपुढे उदाहरण ठेवण्यास सेलिब्रिटी व आदर्श असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा देणे मान्य नाही. सर्व समान आहेत. रिया ड्रग्ज विक्रेत्यांमधील एक भाग नाही. तिने विकत घेतलेले ड्रग्ज अन्य तिसऱ्या व्यक्तीला आर्थिक फायद्यासाठी विकले नाहीत. ती जामिनावर सुटल्यावर गुन्हा करणार नाही, यावर विश्वास ठेवू शकतो. एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (ए), २४, १९ अंतर्गत ती दोषी नसल्याचे दिसते. रियाची एक लाख रुपये तर अन्य दोघांची प्रत्येकी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.