एका तपानंतर अजय देवगण आणि 'हा'खान येणार आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 05:01 PM2018-07-20T17:01:26+5:302018-07-20T17:08:16+5:30
बॉलिवूड स्टार अजय देवगण 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला. काही दिवसांपासून या सिनेमासाठी काजोलला अप्रोच करण्यात आल्याची चर्चा आहे.
बॉलिवूड स्टार अजय देवगण 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला. काही दिवसांपासून या सिनेमासाठी काजोलला अप्रोच करण्यात आल्याची चर्चा आहे. तर अजयच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये सैफ अली खान नेगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी दोघांनी 1998 साली आलेल्या 'कच्चे धागे' सिनेमात एकत्र काम केले होते. आता या दोघांचा हा चौथा सिनेमा आहे.
डीएनएच्या रिपोर्टनुसार यात सैफ राजपूत अधिकारी उदयभान राठोरची भूमिका साकारणार आहे. उदयभान तोच राजपूत अधिकारी आहे ज्याला औरंगजेबने मुगल आर्मीचा चिफ जय सिंगने नियुक्त केले होते. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय या पोस्टरमध्ये एक किल्लासुद्धा दिसत असून, त्यावर फडकणारा भगवा झेंडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
दिग्दर्शक ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढ्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी सिनेमाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. दिग्दर्शक ओम राऊत यांनी याआधी लोकमान्य-एक युगपुरूष या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमातून लोकमान्य टिळकांचा इतिहास रूपेरी पडद्यावर मांडण्यात आला होता. तानाजी मालुसरेंच्या सिनेमाबरोबरच आणखी एक ऐतिहासिक गाथा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.