अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा सिनेमा आज रिलीज झाला. चित्रपटाची कथा बघता, मध्यप्रदेशात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. पण सोशल मीडियावर मात्र या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. होय, ट्विटरवर #BoycottThappad ट्रेंड करतोय. हा चित्रपट न बघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘थप्पड’ हा सिनेमा कौटुंबिक हिंसाचारावर आधारित असून तापसी पन्नू त्यात मुख्य भूमिकेत आहे. अनुभव सिन्हा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
का होतोय ‘थप्पड’ला विरोध? ‘थप्पड’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सीएए व एनआरसीला विरोध केला. तापसी पन्नूही मुंबईत सीएए व एनआरसीविरोधातील रॅलीत सामील झाली. याचमुळे सोशल मीडियावर ‘थप्पड’ला विरोध होतोय. तापसी व अनुभव सिन्हा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या गृहमंत्र्यांचा अपमान केला, असे युजर्सचे म्हणणे आहे. ‘थप्पड’वर बहिष्कार घाला, असे आवाहन करणा-या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘मी कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात आहे. पण तरीही ‘थप्पड’वर माझा बहिष्कार आहे. कारण एक भारतीय असूनही सीएएविरोधात अफवा पसरवणा-या या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मला धडा शिकवायचा आहे,’ असे एका युजरने ‘थप्पड’ला विरोध करत लिहिले आहे.
अन्य एका युजरने तापसीला लक्ष्य केले आहे. ‘आधी दीपिका, आता तापसी. बॉलिवूडने पुन्हा पुनरावृत्ती केली. आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी हे स्टार्स राष्ट्रीय मुद्यांचा वापर करत आहेत. त्यांनी मुद्यांची संवेदनशिलता शिकवायलाच हवी,’ असे या युजरने लिहिले आहे.‘मी आणि माझे कुटुंब हा सिनेमा पाहणार नाही. मी माझ्या मित्रांनाही हा सिनेमा न पाहण्यास सांगेल,’ असे एका युजरने लिहिले आहे.
दुस-या एका युजरने तापसी व अनुभव सिन्हा यांना ‘अर्बन नक्षल’ संबोधले आहे. ‘तापसी व अनुभव सिन्हा देशाच्या पंतप्रधानांचा व गृहमंत्र्यांचा दिवसरात्र अपमान करतात. ‘थप्पड’ला ‘थप्पड’मारा,’ असे या युजरने लिहिले आहे.
याआधी सोशल मीडिया युजर्सनी दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी लावून धरली होती. ‘छपाक’च्या प्रमोशनदरम्यान दीपिकाने जेएनयूला भेट दिली होती. काही लोकांना दीपिकाची जेएनयू भेट खटकली होती. यानंतर तिच्या ‘छपाक’ या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती.