दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी झाला आईचा मृत्यू, वडील पडले एकाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 7:01 AM
अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. १९९३ मध्ये ५ एप्रिल रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर आता ...
अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. १९९३ मध्ये ५ एप्रिल रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनानंतर आता २५ वर्षांनी तिच्या आईचे निधन झाले. दिव्याची आई म्हणजेच मीता भारती यांनी गेल्या आठवड्यात एका खाजगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दिव्याच्या आत्याची मुलगी कायनात अरोराने एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले, दिव्याच्या आईची किडणी पूर्णपणे निकामी झाली होती. त्यांना गेल्या शुक्रवारी रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे तिथेच निधन झाले. दिव्या भारतीच्या मृत्युनंतरदेखील दिव्याचे पती साजिद नाडियाडवाला हे दिव्याच्या आई-वडिलांच्या खूपच जवळचे होते. साजिदने एक जावई म्हणून नव्हे तर मुलगा म्हणून त्यांचा सांभाळ केला. साजिद आणि त्याची पत्नी वारदा यांनी दिव्याच्या वडिलांचा ८० वा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा केला होता. वारदाने या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या वाढदिवसाच्या काहीच दिवसांनंतर दिव्याच्या आईचा मृत्यू झाला. दिव्याच्या आईच्या जाण्याने तिचे वडील आता एकाकी पडले आहेत. दिव्याला एक छोटा भाऊ देखील आहे. दिव्या वयाच्या १६ व्या वर्षी साजिदच्या प्रेमात पडली होती. ‘शोला और शबनम’ या चित्रपटाच्या सेटवर तिची साजिद नाडियाडवालासोबत ओळख झाली. साजिद या चित्रपटाच्या सेटवर गोविंदाला भेटायला गेला होता. गोविंदा हा साजिदचा खूप जवळचा मित्र. गोविंदानेच साजिद आणि दिव्याची ओळख करून दिली होती. पाहाताच क्षणी साजिद दिव्याच्या प्रेमात पडला. काही महिन्यांच्या नात्यानंतर त्या दोघांनी मे १९९२मध्ये लग्न केले. लग्न झाले त्यावेळी दिव्या केवळ १८ वर्षांची होती. लग्न करण्यासाठी दिव्याने इस्लाम हा धर्म स्वीकारून तिचे नाव सना ठेवले होते,असे म्हटले जाते. १९९३ मध्ये दिव्याच्या मृत्यूसाठी साजिदला जबाबदार ठरवले गेले. यादरम्यान साजिदच्या आयुष्यात अनेक चढउतार आलेत. पण त्याच्या आयुष्यात दिव्यानंतर वारदा आली आणि त्याचे आयुष्यच बदलले. साजिद आणि वारदाच्या लग्नाला १५ वर्षं झाली आहेत.Also Read : श्रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटात श्रीदेवी नव्हे तर झळकणार होती ही अभिनेत्री, या अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाले श्रीदेवी यांचे निधन