दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा अक्किनेनी (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही लोकप्रिय जोडी लवकरच विभक्त होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली. त्यानंतर सर्व स्तरांमधून विविध चर्चा रंगत आहेत. यामध्येच दाक्षिणात्य सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अलिकडेच अभिनेत्री कंगना रणौतने तिचं मत मांडलं होतं. त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा कायमच चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर मत मांडलं आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
"लग्नापेक्षा घटस्फोटांचं जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. कारण, लग्नानंतर तुम्हाला कोणत्या दिशेला नेमंक जायचं हे तुम्हाला माहित नसतं. पण, घटस्फोटानंतर तुमची कुठून सुटका झाली आहे हे तुम्हाला माहित असतं", असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. या ट्विटसोबत आणखी एक ट्विट त्यांनी केलं आहे.
"लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात. पण, घटस्फोट स्वर्गात होतो. लग्नाचं जितके दिवस फंक्शन सुरु असतं. तितके दिवसही काहींचं लग्न टिकत नाही. त्यामुळेच संगीत हा घटस्फोटाच्या प्रक्रियेतील एक भाग असला पाहिजे. सगळ्या घटस्फोटीत पुरुष आणि स्त्रियांनी मस्त गाणी म्हणून त्यावर डान्स केला पाहिजे. लग्न म्हणजे ब्रिटीश शासन आणि घटस्फोट म्हणजे स्वातंत्र. लग्न म्हणजे हिटलरसारखं युद्ध करण्याप्रमाणे आहे. तर घटस्फोट म्हणजे म. गांधीच्या स्वतंत्रतेच्या विजयाप्रमाणे आहे", असं राम गोपाल वर्मा म्हणाले.
समंथाच्या एक्स बॉयफ्रेंडनेही दिली प्रतिक्रिया
समंथा- नागा चैतन्यच्या घटस्फोटावर समंथाच्या एक्स बॉयफ्रेंडने अभिनेता सिद्धार्थनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘ शाळेत असताना शिक्षकांकडून सर्वप्रथम मी एकच धडा शिकलो होतो, तो म्हणजे, धोकेबाजांचं कधीच भलं होत नाही...,’ असं ट्विट सिद्धार्थने केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने समंथाच्या नावाचा उल्लेख कुठेही केला नाही. मात्र, त्याने अप्रत्यक्षरित्या तिला टोला मारल्याचं समोर आलं आहे.