Remake of Deewaar : सुमारे दशकभरापूर्वी बॉलिवूडने जुन्या हिंदी सिनेमांचे रिमेक बनवण्याचा नुसता धडाका लावला होता. जो तो जुन्या हिंदी क्लासिक चित्रपटांचा रिमेक बनवू इच्छित होता. या काळात अनेक रिमेक आलेत. काही हिट झालेत तर काही फ्लॉप. काही चित्रपटांचे रिमेक मात्र बनता बनता राहिले. यापैकीच एक होता दीवार. होय, 1975 साली रिलीज झालेला अमिताभ बच्चन, शशी कपूर यांचा ‘दीवार’ (Deewaar) हा सिनेमा तुफान गाजला होता. आजही या चित्रपटाचं नाव ऐकलं तरी ‘मेरे पास माँ है’ हा एक डायलॉग हमखास आठवतो. ‘दीवार’चा रिमेक बनवण्याची शाहरूख खानची ( Shah Rukh Khan) भरून इच्छा होती.
1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’चा रिमेक शाहरूखने बनवला होता आणि तो हिट झाला होता. डॉनच्या रिमेकनंतर ‘दीवार’चा रिमेक बनवण्याची शाहरूखची इच्छा होती. आपल्या रेड चिलीज या बॅनरअंतर्गत शाहरूख स्वत:च हा रिमेक प्रोड्यूस करणार होता. यासाठी त्याने दिग्दर्शक यश चोप्रांच्या घराचे उंबरठे झिजवले. कारण यश चोप्रा यांनीच या रिमेकचं दिग्दर्शन करावं,अशी त्याची इच्छा होती. अर्थात यश चोप्रा यांनी मीडियात कधीच याचा उल्लेख केला नाही.
स्टारकास्टही झाली होती फायनल..‘दीवार’चा रिमेक बनवण्यासाठी शाहरूख इतका उतावीळ झाला होता की, त्याने स्टारकास्टही फायनल केली होती. अमिताभ बच्चन यांचा रोल शाहरूख स्वत: करणार होता आणि शशी कपूर-नीतू सिंगच्या भूमिकेसाठी सैफ अली खान आणि करिना कपूर यांची नावं त्याने ठरवली होती. इफ्तिखारची भूमिका बोमन इराणी आणि निरूपा रॉयने साकारलेलं पात्र शेफाली शाह जिवंत करणार होती. फक्त परवीन बाबीनं साकारलेल्शा पात्रासाठी घोडं अडलं होतं. शाहरूख या पात्रासाठी प्रियंका चोप्रा वा दीपिका पादुकोण या दोघींपैकी कुण्या एकीला घ्यायचा विचार करत होता. ‘डॉन’मध्ये शाहरूखसोबत प्रियंका होती आणि तिला लोकांनी पसंत केलं होतं. दीपिका त्याला हवी होती पण तोपर्यंत ‘ओम शांती ओम’ रिलीज व्हायला होता. दीपिकासोबतची आपली केमिस्ट्री कशी दिसते, याची शाहरूखला प्रतीक्षा होती.
‘ओम शांती ओम’ आला, सुपरहिट झाला. लोकांना शाहरूख व दीपिकाची केमिस्ट्रीही आवडली. पण ‘दीवार’च्या रिमेकचं म्हणाल तर तो रखडला तो रखडलाच. असं म्हणतात की, यश चोप्रा यांना ‘दीवार’चा रिमेक बनण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता आणि शाहरूखला तर यशजी हेच दिग्दर्शक म्हणून हवे होते. त्यांनी होकार दिला तरच ‘दीवार’चा रिमेक बनणार यावर तो ठाम होता. यशजींनी शेवटपर्यंत होकार दिला नाही आणि ‘दीवार’चा रिमेक कधीच बनला नाही.