भुवनेश्वरच्या कलिंग सेना या स्थानिक संघटनेने किंगखान शाहरुख खान याला धमकी दिली आहे. होय, या धमकीनंतर शाहरुखच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ओडिशात येत्या २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या मेन्स हॉकी वर्ल्ड कपच्या उद्घाटन समारंभात शाहरूख सहभागी होण्यास या संघटनेचा विरोध आहे. त्यामुळे ओडिशात शाहरुखने पाय ठेवल्यास त्याच्या चेहºयावर शाही फेकण्याची धमकी कलिंग सेनेने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिंग सेनेच्या या धमकीनंतर ओडिशात शाहरुखच्या दौ-यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भुवनेश्वरचे डीसीपी अनुप साहू यांनी सांगितले की, हॉकी वर्ल्ड कपदरम्यान शाहरुखच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल. अर्थात अद्याप शाहरूख या सोहळ्याला येणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.येत्या २७ नोव्हेंबरपासून ओडिशात हॉकी वर्ल्ड कप सुरु होतोय. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी शाहरूखला निमंत्रण पाठवले आहे. हॉकी वर्ल्ड कपच्या आॅफिशिअल अँथम साँगमध्येही शाहरूख दिसला होता. या अँथम साँगच्या टीजमध्ये किंगखानला पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याची जोरदार प्रशंसा केली होती. शाहरूखने त्यांचे आभारही मानले होते.
काय आहे प्रकरणओडिशात शाहरूखला विरोध होण्यामागे काय कारण असावे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे प्रकरण १७ वर्षे जुने आहे. होय, १७ वर्षांपूर्वी शाहरुखचा ‘अशोका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा व कलिंगची संस्कृती चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. हा ओडिशातील जनतेचा अपमान असल्याचे कलिंग सेनेचे म्हणणे आहे. ओडिशातील लोकांच्या भावना दुखावण्याबद्दल शाहरूखने माफी मागावी, अशी कलिंग सेनेची मागणी आहे. २००१ मध्ये ‘अशोका’ रिलीज झाल्यानंतर या वादाची सुरूवात झाली होती. रिलीजच्या एक आठवड्यानंतर ‘अशोका’ ओडिशातून हटवावा लागला होता.