तनिष्क या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीवरून असा काही वाद पेटला की, अखेर तनिष्कला आपली ही जाहिरात मागे घ्यावी लागली. या जाहिरातीवरून सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला. एकीकडे #Boycotttanishk तर दुसरीकडे #ISupporttanishk असे हॅशटॅग ट्रेंड झालेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या वादात उडी घेतली. एकीकडे कंगना राणौत ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे स्वरा भास्कर, रिचा चड्ढा या अभिनेत्रींनी या जाहिरातीचे समर्थन केले. दिग्दर्शक कबीर खानची पत्नी व अभिनेत्री मिनी माथूर हिनेही तनिष्कच्या जाहिरातीला विरोध करणा-यांवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाली मिनी माथूर?तनिष्कच्या जाहिरातीला होत असलेला विरोध पाहून मिनी भडकली. ‘काही धर्मांधांनी ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देते, अशी बोंब ठोकली आणि तनिष्कला ही जाहिरात मागे घ्यावी लागली. काय आहे लव्ह जिहाद ? आंतरधर्मिय विवाहानंतर माझ्या कुटुंबात मी हेच प्रेम अनुभवले आहे आणि तरीही तनिष्कने केवळ काही धर्मांधाच्या विरोधामुळे ही इतकी सुंदर जाहिरात मागे घ्यावी याचा अर्थ काय? धर्माने का आणि कसा फरक पडतो. आपली येणारी पिढीची यात काय भूमिका असेल? धर्माच्या नावावर द्वेष वाढत असेल तर त्यापेक्षा हे जग नास्तिक व्हावे, असे मला वाटते. माझ्या देशात शांतता आणि सौहार्द नांदावे, असे वाटत असेल तर ही भावनाही देशभक्तीच्या भावनेपेक्षा कमी नाही,’ असे मिनी माथूर म्हणाली.
काय आहे वादतनिष्कने आपल्या नव्या ज्वेलरी कलेक्शनच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात एक नवी जाहिरात प्रसारित केली होती. ही जाहिरात प्रसारित होताच त्यावरून वादाला तोंड फुटले होते. 43 सेकंदाच्या या जाहिरातीत मुस्लिम कुटुंबात लग्न करून गेलेल्या हिंदू तरूणीसाठी तिच्या सासरचे लोक हिंदू प्रथेप्रमाणे डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतात. तनिष्कने युट्यूबवर ही जाहिरात पोस्ट केली होती. ‘तिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाºया घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे, ’असे ही जाहिरात पोस्ट करताना लिहिण्यात आले होते.43 सेकंदांच्या ही जाहिरात तनिष्कचा ‘एकत्वम’ हा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र वाढत्या वादानंतर तनिष्कच्या सर्व सोशल मीडिया चॅनेल्सवरून ती हटविण्यात आली आहे. सुरूवातीला तनिष्कने युट्यूब आणि फेसबुकवर कमेन्ट्स तसेच लाइक्स-डिसलाइक्स बंद केल्या. नंतर मात्र त्यांनी ती जाहिरातच काढून घेतली.