ऑस्कर हा जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कारांपैकी एक आहे. भारतीय चित्रपटांचंही ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न फार पूर्वीपासून राहिलेलं आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपट नॉमिनेट झाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आता यातच सर्व भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे 'लापता लेडीज'नंतर भारतीय कलाकारांचा आणखी एक दमदार चित्रपट 'ऑस्कर'च्या शर्यतीत आहे.
ऑस्कर २०२५ साठी नॉमिनेट झालेल्या या चित्रपटाचं नाव 'संतोष' असं आहे. युकेतर्फे मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 'संतोष'ची निवड करण्यात आली. ज्याप्रमाणे भारताने 'लापता लेडीज'ची निवड केली. त्याप्रमाणे यूकेने 'संतोष' या चित्रपटाची निवड केली. हा सिनेमा संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत केलेला आहे. यात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहे. सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे आणि इतर कलाकारांनी या सिनेमात भूमिका केल्या आहेत.
UK ने 'संतोष'ची निवड का केली?UKने 'संतोष' चित्रपट ऑस्करसाठी पाठवला. कारण, तो तेथे प्रदर्शित झाला आणि त्यात ब्रिटिश निर्मात्यांचा हात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन सरटेन रिगार्ड विभागात ‘संतोष’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होता. या चित्रपटात उत्तर भारतातील एका विधवा महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. जी पतीच्या मृत्यूनंतर आश्रित कोट्यातून हवालदार बनते. एका तरुणीच्या हत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करते. यानंतर मग तिच्या आयुष्याला घडणाऱ्या घटना या चित्रपटात पाहायला मिळतात.