गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदी यांचा भव्यदिव्य शपथविधी समारंभ पार पडला. सुमारे साडेसहा हजार मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेल्या या समारंभात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. निमंत्रण मिळालेल्या जवळपास प्रत्येकाने या समारंभास हजेरी लावली. पण अभिनेत्री काजल अग्रवाल ही मात्र निमंत्रण मिळूनही या समारंभात हजर राहू शकली नाही. याचे दु:ख काजलने बोलून दाखवले.इन्स्टाग्रामवर मोदींच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका शेअर करत तिने याबद्दल दु:ख व्यक्त केले.
‘शपथविधी समारंभास मला निमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार. हे निमंत्रण माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या क्षणांचे साक्षीदार झाली असती तर आनंद झाला असता. पण मला निमंत्रण उशीरा मिळाले. त्यामुळे मी वेळेत दिल्लीला पोहोचू शकले नाही, याचे दु:ख वाटतेय,’असे काजलने लिहिले. या पोस्टमध्ये तिने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही टॅग केले.