मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर (Mithila Palkar). उत्तम अभिनयामुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केले आहे. मराठीत मिथिलाने मुरांबा या चित्रपटात काम केले आहे. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. मात्र या चित्रपटानंतर मिथिला कोणत्याच मराठी सिनेमात झळकली नाही. मात्र आता एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितले आहे.
मिथिला पालकरने २०१४ साली माझं हनिमून नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये पहिल्यांदा काम केले होते. ही फिल्म १६ व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली. जून २०१४ मध्ये तिला कट्टी बट्टी हा चित्रपट मिळाला. नंतर तिने वेब सीरिज, मराठी, हिंदी सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मुरांबा या मराठी सिनेमातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कारवाँ या हिंदी चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. लिटिल थिंग्ज या सीरिजनंही तिला एक वेगळी ओळख दिली.
अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, पण...मुरांबानंतर मराठी चित्रपटात मिथिला का झळकली नाही, याबद्दलचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. ती म्हणाली की, मुरांबा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण मला काही विषय पटले तर काही नाही भावले. काही चित्रपट हे आधी घेतलेल्या प्रोजेक्टमुळे करता आले नाहीत.
भूमिका पटते तेव्हाच मी ती करते
ती पुढे म्हणाली की, मला जेव्हा एखादी भूमिका पटते तेव्हाच मी ती करते. त्यात प्रेक्षकांचीही साथ मिळते. ते मला सांभाळूनही घेतात. समोरच्याला आनंद होईल की नाही किंवा कोणाचं मन सांभाळायचं म्हणून भूमिका स्वीकारत नाही. जेव्हा मला ते पात्र पटते, तेव्हाच मी त्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देते.