Join us

कॅन्सरवर मात केल्यानंतर शूटिंगसाठी सज्ज झाला संजय दत्त, चित्रपटात करणार दमदार अ‍ॅक्शन

By तेजल गावडे | Published: November 11, 2020 4:16 PM

अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे आणि तो लवकरच शूटिंगला सुरूवात करणार आहे.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे. पण त्याच्या फिटनेसबाबत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सांगितले गेले होते की संजय दत्तच्या तब्येतीची काळजी लक्षात घेता त्याच्या सिनेमात अ‍ॅक्शन सीन कमी असतील. हेदेखील म्हटले गेले होते की संजय दत्त कदाचित कधीच चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करू शकणार नाही. हीच भीती निर्मात्यांना वाटत होती. पण नेहमीप्रमाणे वाईट काळात स्वतःला सिद्ध करून दाखवणाऱ्या संजय दत्तने पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे.

संजय दत्त सध्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो आहे. तो चित्रपटात कोणतीही तडजोड करायला तयार नाही. तो प्रत्येक सीनमध्ये जीव तोडून काम करतो. त्यामुळे त्याला अ‍ॅक्शन सीन करायला काहीच हरकत नाही. 

केजीएफ २मध्ये मुख्य भूमिका साकारणारा यशने संजय दत्तची खूप प्रशंसा केली. तो म्हणतो की इतकी उर्जा असणारा दुसरा व्यक्ती मी पाहिला नाही. संजय दत्त तर अ‍ॅक्शन सीनच्या माध्यमातून स्क्रीन फाडून टाकेल.

एका न्यूज पोर्टलनुसार, आता निर्माते चित्रपटातील कोणताच सीन एडिट करणार नाही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की संजय दत्तने खूप हिंमत दाखवली आहे आणि त्याला सगळे सीन करायचे आहेत. त्यामुळे आता अ‍ॅक्शनचा डोस कमी होणार नाही.

संजय दत्त केजीएफ २ शिवाय भुज द प्राइड ऑफ इंडियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातही तो अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संजय दत्तच्या तब्येतीमुळे मेगा बजेट चित्रपट केजीएफ२च्या शूटिंगला उशीर झाला आहे. मात्र अभिनेता यशच्या नुसार संजय दत्तने अर्ध्याहून जास्त शूटिंग आधीच पूर्ण केले आहे. आता फक्त त्याचे अ‍ॅक्शन सीन बाकी आहेत जे तो लवकरच शूट करेल.

टॅग्स :संजय दत्त