बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत येत आहे. बऱ्याच वर्षानंतर प्रियांकाने बॉलिवूड सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये जर गॉडफादर नसेल तर तेथे पाय रोवणं फार कठीण आहे, असं वक्तव्य प्रियांकाने केलं. तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वात मोठं वादळ उठलं असून अनेक जण याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता प्रसिद्ध गायक अमाल मलिक याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’नुसार, अमाल मलिकने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं आहे. “ही गोष्ट मी रोजच अनुभवतो. मी बॉलिवूड सिनेमांसाठी काम का करत नाही असा प्रश्न कायम माझे चाहते मला विचारतात. या मागचं खरं कारण सांगायचं झालं तर इथली कंपूशाही, तळवे चाटण्याची वृत्ती या गोष्टी कारणीभूत आहेत. बॉलिवूडने या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पहा, यांनी प्रियांकासारख्या अभिनेत्रीसोबतही काय केलं आहे, असं अमाल मलिक म्हणाला.
दरम्यान, प्रियांकाने बॉलिवूड सोडण्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर कंगना रणौतनेही तिची बाजू घेतली. इतकंच नाही तर कलाविश्वातील अनेक कलाकार आता याविषयी व्यक्त होताना दिसत आहेत.
काय म्हणाली प्रियांका?
“मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला ‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्यने एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला फोन करुन तुला अमेरिकेत म्युझिकमध्ये करिअर करायचंय का असं विचारलं. त्यावेळी मी ‘सात खून माफ’ची शूटिंग करत होते आणि मलाही बॉलिवूडमधूल काढता पाय घ्यायचा होता. मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.”