Join us

पुण्यानंतर नागपुरातही ‘इंदू सरकार’ला विरोध; मला अभिव्यक्ती स्वातंत्र नाही काय? मधुर भांडारकरचा सवाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2017 12:07 PM

​दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला विरोध वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला विरोध वाढतच असल्याचे दिसून येत आहे. काल पुण्यात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर आज नागपूर येथेही मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद उधळून लावली आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पत्रकार परिषद होऊ दिली नाही. अखेर संतापलेल्या मधुर भांडारकर यांनी कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.

मधुर भांडारकर यांनी आपला राग व्यक्त करताना ट्विटच्या माध्यमातून लिहिले की, ‘राहुलजी, पुण्यानंतर आजपण पत्रकार परिषद रद्द करावी लागली. कॉँग्रेसच्या गुंडगिरीला तुमचे समर्थन आहे काय? देशात मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? ’ नागपुरात मधुर भंडारकर हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये थांबले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना हे समजताच कार्यकर्ते हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये धडकले. त्याचवेळी मधुर भांडारकर पोलीस सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर रवाना झाले. भांडारकरच्या मागोमाग काँग्रेस कार्यकर्तेही विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मधुर भांडारकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा इरादा असल्याचेही समोर आले आहे.

काल पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता नागपुरातही भांडारकरची पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केले गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मधुर भांडारकर यांनी म्हटले की, नागपुरात ‘इंदू सरकार’ या चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद होणार होती. त्याचवेळी मला फोन आला की, तुम्ही याठिकाणी पत्रकार परिषद घेऊ शकणार नाही. कारण येथेही तुम्हाला विरोध केला जात आहे. काही वेळानंतरच सुमारे १५० लोक माझ्या आणि चित्रपटाविरोधात नारेबाजी करीत होते. ज्या पद्धतीने पुण्यात विरोध केला गेला, अगदी तसाच विरोध नागपुरातही केला गेला.

पुढे बोलताना मधुर भांडारकर यांनी म्हटले की, ‘राहुल गांधींना मी खूपच विन्रमपणे विचारले की, देशात मला अभिव्यक्ती स्वातंत्र नाही काय? मी सुरुवातीपासूनच सांगत आलो की, माझा हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक आहे. हा चित्रपट आणीबाणीवर नाही शिवाय डॉक्युमेंट्रीही नाही. चित्रपटात केवळ एका इंदू नावाच्या मुलीची कथा आहे. ही कथा तेव्हाची आहे, जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.

दरम्यान, चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरु द्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. २८ जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.