गेल्या बुधवारी अभिनेता इरफान खानचे निधन झाले. दुस-याच दिवशी गुरुवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली आणि आज शुक्रवारी बॉलिवूडमधील आणखी एका दिग्गजाच्या निधनाची बातमी आली. फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे सीईओ कुलमीत मक्कड यांचे आज मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. करण जोहर, अशोक पंडित, विद्या बालन आदींनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
‘कुलमीत तुम्ही प्रोड्यूसर गिल्डचे एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ होते. तुम्ही इंडस्ट्रीच्या उन्नतीसाठी सतत काम केले. खूप लवकर तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्ही कायम आठवणीत राहान,’ असे करण जोहरने लिहिले.
विद्या बालन हिनेही कुलमीत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. प्राप्त माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे कुलमीत धर्मशाळा येथे अडकून पडले होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. मनोरंजन उद्योगात 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून कुलमीत सक्रीय होते. यादरम्यान ते सारेगामा, रिलायन्स एंटरटेनमेंट अशा अनेक कंपनीशी संलग्न होते. 2010 मध्ये त्यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या सीईओ पदाचा पदभार स्वीकारला होता.