अजय देवगणचा चित्रपट दृश्यमचा दिग्दर्शक निशिकांत कामतच्या निधनाची अफवा सगळीकडे पसरत आहे. या वृत्तात तथ्य नसल्याचे अभिनेता रितेश देशमुखने सांगितल्यानंतर आता दिग्दर्शक मिलाप झवेरीनेदेखील हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर निशिकांत कामतच्या निधनाची माहिती दिली होती पण नंतर आणखीन एक पोस्ट शेअर करत निधन झाले नसून व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत यकृताशी संंबंधित आजाराशी सामना करत आहे आणि त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिलाप झवेरीने पहिले ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, दुःखद बातमी आहे की निशिकांत कामतचे निधन झाले. त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये माझ्या पहिल्या नाटकाचे परीक्षण केले होते. त्यांनी मला सर्वोत्कृष्ट अभिनेता व लेखकाचा पुरस्कार दिला होता. ते अभिषेक बच्चन अभिनीत सनक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. दुःखद आहे की हा चित्रपट होऊ शकला नाही, आम्हाला नेहमी तुमची आठवण येईल. त्यानंतर लगेचच त्याने दुसरे ट्विट करत सांगितले की निशिकांत कामत यांचे निधन झाले नाही. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत.
रितेश देशमुखने ट्विट करत लिहिले, निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहे. तो मृत्यूशी झुंज देतो, त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करुया. असे ट्विट रितेशने काही वेळापूर्वी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. निशिकांत कामतला यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास आहे आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निशिकांत कामतने 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला.