हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी कधीच संपुष्टात आली आहे. ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणाऱ्या आर. के. स्टुडिओची वास्तू गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. आता आर के स्टुडिओनंतर राज कपूर (Raj Kapoor) यांचा चेंबूरमधील बंगलाही विकला गेला आहे. अनेक एकरवर पसरलेला हा बंगला सुद्धा गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने खरेदी केला आहे.
हा बंगला किती कोटीत विकला गेला, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण ही डील १०० कोटींत झाल्याचं कळतंय.ही प्रॉपर्टी दिवंगत राज कपूर यांचे कायदेशीर वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून खरेदी करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
राज कपूर यांचा हा बंगला मुंबईतील चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाजूला स्थित आहे. हा परिसर चेंबूर, मुंबईतील सर्वात पॉश, प्रीमियम एरिया मानला जातो. त्यामुळे ही अतिशय महागडी डील असल्याचं मानलं जात आहे. हा बंगला विकत घेण्याआधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने राज कपूर यांचा आरके स्टुडिओ खरेदी केला होता. हा बंगला ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न फ्रीवेच्या जवळ आहे.
आरके स्टुडिओ खरेदी केल्यानंतर त्याजागी गोदरेज आरकेएस डेव्हलप केलं जात आहे. हा प्रोजक्ट २०२३ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता राज कपूर यांचा बंगला खरेदी केल्यानंतर त्याजागी गोदरेज एक महागडा रिअल इस्टेट प्रोजेक्ट तयार करणार आहे.
आर के स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर ‘सुपर डान्सर’या डान्स रिअॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली होती. या आगीत अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्या होत्या. यानंतर काहीच महिन्यांत हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला होता.