Join us

संजय दत्तनंतर आता या अभिनेत्याला झाला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी आहे पैशांची गरज

By तेजल गावडे | Published: September 21, 2020 6:00 PM

अभिनेता भूपेश कुमार पंड्याची सध्या जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे आणि त्याला पैशांची खूप गरज आहे.

आयुषमान खुरानाने पदार्पण केलेला चित्रपट विकी डोनरमधील चमन या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूपेश कुमार पंड्याची सध्या जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे आणि त्याला पैशांची खूप गरज आहे. त्याला काही कलाकारांनी मदतीचा हात दिला आहे आणि इतकंच नाही तर इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

भूपेशवर गुजरातमधील अहमदाबाद इथल्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक टंचाईमुळे उपचारामध्ये अडचणी येत आहेत. उपचारासाठी त्याला २५ लाख रुपयांची गरज आहे. काही कलाकारांनी मदत केली असून इतरांना मदतीसाठी आवाहनदेखील केले आहे. यात मनोज वाजपेयी, राजेश तेलंग आणि गजराज राव या कलाकारांचा समावेश आहे. मनोज वाजपेयीने सोशल मीडियावर भूपेश कुमार पंड्याचा फोटो शेअर करत लिहिले की, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की एनएसडी ग्रॅज्युएट झालेला सोबती भूपेशच्या मदतीसाठी सहकार्य करा. 

भूपेश कुमार पंड्याची पत्नी छाया पेशाने शिक्षिका आहे. तिने सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि माझी नोकरीदेखील गेली. आता पैशांची नितांत गरज आहे. भूपेशला दोन मुले आहेत. त्याची पत्नी पुढे म्हणाली की, दुर्भाग्य आहे की माझ्या नवऱ्याला चौथ्या स्टेजचा कर्करोग झाला आहे. आताही ते सपोर्टिव्ह केअरवर आहेत.

भूपेश कुमार पंड्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून ग्रॅज्युएशन केले आहे. त्याने विकी डोनर चित्रपटाशिवाय हजारों ख्वाहिशें ऐसी या चित्रपटात काम केले आहे. तसेच काही मालिकांमध्येही काम केले आहे.