Join us

बँडिट क्वीन सिनेमातील 'त्या' सीनमुळे रात्रभर रडायच्या सीमा बिस्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 3:01 PM

याविषयी कुटुंबीयांना माहिती असल्याने कोणत्याच स्पष्टीकरणाची गरज पडली नाही असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

चित्रपटसृष्टीत आजवर बरेच बायोपिक आलेत. प्रत्येक चित्रपटाला रसिकांची दाद मिळाली आहे. मात्र बायोपिक चित्रपटांचा रिलीजपर्यंतचा प्रवास सोपा नसतो. कारण ज्या व्यक्तीवर  चित्रपट असतो त्याच्या प्रतिमेला धक्का लागू नये अशी प्रत्येकाची भावना असते. त्यावरून अनेक वादही होतात. असाच वाद फूलन देवी यांच्या बायोपिकवरून झाला होता. फूलन देवी यांच्या जीवनावर बनलेला बँडिट क्वीन हा चित्रपट बराच वादात सापडला होता. या चित्रपटाची रिलीजआधीच बरीच चर्चा झाली होती..या चित्रपटात अभिनेत्री सीमा बिश्वास यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

 

या भूमिकेमुळे बिश्वास यांच्यावर त्यावेळी बरीच टीका झाली होती. या चित्रपटातील न्यूड सीनमुळे त्यांची बरीच चर्चा झाली होती. हाच न्यूड सीन शूट केल्यानंतर सीमा रात्रभर रडल्या होत्या. जेव्हा या सीनचे शूटिंग सुरु होते तेव्हा दिग्दर्शक आणि कॅमेरामॅनशिवाय सेटवर कुणालाही प्रवेश नव्हता. या चित्रपटाबद्दल लोकांची प्रतिक्रिया फार खराब होती. विशेषतः चित्रपटातील न्यूड सीनबद्दल लोकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या असं बिश्वास यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेनं पाहू लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. लोक तिरस्कार करू लागल्याचंही त्यांनी म्हटलंय. या चित्रपटाआधी त्यांनी कधीच बोल्ड सीन दिला नव्हता. त्यासाठी बॉडी डबलचा वापर केल्याचं त्यांनी सांगितले आहे.

 

याविषयी कुटुंबीयांना माहिती असल्याने कोणत्याच स्पष्टीकरणाची गरज पडली नाही असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. बँडिट क्वीन चित्रपटातील बलात्काराच्या सीननंतर संपूर्ण युनिट रडू लागलं आणि तो आपल्यासाठी भावुक क्षण होता असं त्यांनी म्हटलंय. दिग्दर्शक शेखर कपूर यांना चित्रपटातील न्यूड सीन हटवण्याची बिश्वास यांनी मागणी केली होती. मात्र सत्य घटनेवरील चित्रपट असल्याने तसे करण्यास नकार दिल्याचं बिश्वास यांनी सांगितलं. हा चित्रपट रिलीजआधीच बराच वादात सापडला होता. स्वतः फूलन देवी यांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. या चित्रपटाला नंतर कोर्टाची मंजूरी मिळाली आणि चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो सीन आपण केला नव्हता तरीही हॉलिवूडमध्ये आजही रसिक त्या सीनसाठी सलाम करतात मात्र भारतात अशा सीन्सला वेगळ्याच दृष्टीने पाहिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.