बॉलिवूड व हॉलिवूड अभिनेत्री यासोबतच भोजपुरी व मराठी सिनेमांची निर्माती अशी एक नवी ओळख प्रियंका चोप्राने निर्माण केली आहे. आता प्रियंका स्वत:साठी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण म्हणजे, अनेक प्रयत्न करूनही प्रियंकाला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाहीये. सलमान खानचा ‘भारत’ नाकारल्यानंतर तिला घ्यायला फारसे कुणीच उत्सुक नाही. यादरम्यान संजय लीला भन्साळींकडून तिला मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिथेही सलमानने आपला ‘व्हेटो’ वापरला.
भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या चित्रपटात प्रियंका लीड रोलमध्ये होती. भन्साळींनी या चित्रपटाची गाणी बनवण्याचे कामही सुरु केले होते. पण अचानक भन्साळींनी हा चित्रपट थांबवून ‘इंशाअल्लाह’ची घोषणा केली. यात सलमान खान व आलिया भटला घेतले. सध्या भन्साळी दिवसरात्र या चित्रपटाच्या तयारीत गुंतले आहेत. साहजिकच प्रियंकाचा ‘हीरामंडी’ लटकला.
सूत्रांचे मानाल तर, तिने दोन कथा निवडल्या आहेत. प्रियंकाच्या टीमने या दोन कथांसाठी दिग्दर्शकाचा शोध सुरु केला आहे. अर्थात सलमानच्या भीतीमुळे कुणी मोठा दिग्दर्शक प्रियंकाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास राजी होईल, अशी शक्यता कमी आहे. पण प्रियंकाला लवकरात लवकर या चित्रपटाची घोषणा करायची आहे. आता याला तुम्ही करिअर वाचवण्याची धडपड म्हणा की आणखी काही पण प्रियंकाला आता चित्रपट हवा आहे. बॉलिवूडमध्ये नाव टिकवायचे तर हे करावेच लागणार.