अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
कोणत्याही कलाकाराला करता आले नाही ते काम सोनू सूदने करून दाखवले या शब्दांत सोनूचे सगळेच कौतुक करत आहेत. सोनू सूदनंतर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या मजूरांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अमिताभ बच्चन आणि त्यांची टीम मिळून मजूरांना उत्तर प्रदेशला पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या टीमने या मजूरांना खाण्यापिण्याच्या वस्तू, पाण्याच्या बॉटल्स, चप्पल अशा गोष्टी नुकत्याच वाटल्या आहेत. आता अमिताभ आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांनी उद्या उत्तर प्रदेशला १० पेक्षा जास्त बसेस रवाना होणार आहेत.
कोरोनाच्या संकटात अमिताभ बच्चन सतत मदत करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत २० हजार पीपीई किट्स वाटली होती. तसेच अनेक ठिकाणी ते जेवणाची पाकिटं देखील लोकांना देत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे लोकांना कोरोना व्हायरसपासून दूर राहाण्याचे सल्ले देत आहेत. अमिताभ बच्चन यांनी फिल्म फेडरेशनमधील सगळ्यात महत्त्वाची फेडरेशन मानल्या जाणाऱ्या ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कॉन्फेडरेशनच्या एक लाख सदस्यांना एक महिन्याचे धान्य देखील मोफत दिले होते.