Join us

‘ठाकरे’नंतर सुरु झाली जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 4:01 PM

‘ठाकरे’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेले राजकीय नेते संजय राऊत यांनी पुन्हा एका बायोपिकची तयारी सुरु केली आहे. होय, संजय राऊत आता दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरचा चित्रपट घेऊन येणार आहेत.

‘ठाकरे’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेले राजकीय नेते संजय राऊत यांनी पुन्हा एका बायोपिकची तयारी सुरु केली आहे. होय, संजय राऊत आता दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरचा चित्रपट घेऊन येणार आहेत. येत्या मार्चपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असे कळतेय. चित्रपटाची कथा १९५० च्या मध्यापासून तर १९७५ पर्यंत जॉर्ज यांनी मुंबईत घालवलेल्या कालखंडावर आधारित असेल, असेही सांगितले जातेय. गत २९ जानेवारीला कामगारांचे नेते व माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले. जॉर्ज हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय निकट होते. त्यांची ही मैत्री पडद्यावर दाखवली जाणार आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटातही एका ठिकाणी बाळासाहेब व जॉर्ज यांना एका फ्रेममध्ये दाखवण्यात आले आहे.

‘ठाकरे’ प्रमाणेच जॉर्ज यांचे बायोपिकही हिंदी व मराठी अशा दोन भाषांत तयार होईल. ‘पीकू’ व ‘अक्टूबर’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक शूजित सरकार या बायोपिकचे दिग्दर्शन करतील, अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आलेली नाही. मध्यंतरी जॉर्ज यांच्या पत्नी लैला फर्नांडिस यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून या बायोपिकला विरोध दर्शवला होता.

मी व माझा मुलगा या बायोपिकच्या कल्पेनेसंदर्भात साशंक आहोत. जॉर्ज यांच्या आयुष्यातील तथ्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले जाईल, अशी भीती आम्हाला आहे. सार्वजनिक आयुष्यात जॉर्ज यांना अनेकदा चुकीचे ठरवण्यात आले. राऊत यांनी जॉर्ज यांच्या आयुष्यावर बायोपिक काढण्याची घोषणा करण्यापूर्वी आपण आमच्या कुटुंबाशी चर्चा केली असती तर ते शिष्टाचाराला धरून झाले असते. एखाद्या व्यक्तिवर तुम्ही चित्रपट काढू इच्छित असाल तर त्यापूर्वी त्याच्याशी वा त्याच्या कुटुंबाशी चर्चा करणे, त्यांना स्क्रिप्ट ऐकवणे, हा सामान्य शिष्टाचाराचा भाग आहे. जॉर्ज सार्वजनिक आयुष्य जगले. म्हणून त्यांच्या कामाबद्दल विचार मांडण्याचा लोकांना पूर्ण हक्क आहे. पण तेवढाच हक्क त्यांच्या कुुटुंबालाही आहे. कुटुंबाच्या परवानगीशिवाय हे बायोपिक साकारता कामा नये, असे त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :जॉर्ज फर्नांडिससंजय राऊतठाकरे सिनेमा