पहलगामला (pahalgam attack) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांना चांगलाच धक्का बसला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा जगभरातील राजकीय व्यक्ती आणि सामान्य माणसांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेता फवाद खान (fawad khan) आणि अभिनेत्री वाणी कपूर (vaani kapoor) यांच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदीची मागणी करण्यात येत आहे.
फवाद खान पुन्हा निशाण्यावर
'अबीर गुलाल' या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान प्रमुख भूमिकेत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर पहलगाम हल्ला झाल्यावर #BoycottAbirGulaal हा हॅशटॅग वापरून आपला विरोध नोंदवला आहे. जेव्हा अशा देशातून भारतावर हल्ले होतात, अशा पाकिस्तानातून आलेल्या कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान देणे योग्य नाही, असं मत दर्शवत लोकांनी 'अबीर गुलाल' सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
'अबीर गुलाल'ची रिलीज डेट बदलणार?
'अबीर गुलाल' सिनेमाला जो विरोध होतोय त्या विरोधामुळे 'अबीर गुलाल' चित्रपटाच्या प्रदर्शनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या या सिनेमाला सगळीकडून विरोध होतोय. या सिनेमातून फवाद खान अनेक वर्षांनी पुन्हा बॉलिवूड सिनेमात दिसणार होता. आता फवादचा सिनेमा प्रदर्शित होणार की नाही? हे थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल.