बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा चांगलाच हीट ठरला आहे. चित्रपटाने आतापर्यंतचे कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच शाहरुखवर टीका झाल्या. चित्रपट न चालू देण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. पण, तरीही हा चित्रपट जोरदार चालला. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खानचा हा चित्रपट आला आहे. शाहरुखचे करिअर संपले आहे आणि त्याचे चित्रपट चालत नाहीत,अशा चर्चा सुरू होत्या. पण 'पठाण'च्या यशाने हा मुद्दा चुकीचा ठरला. त्यामुळे, मिळालेल्या यशानंतर शाहरुखने आज पहिल्यांदाच मीडियासमोर येऊन सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यावेळी, स्वत:मधील आत्मविश्वासाबद्दलही शाहरखने मत मांडलं.
पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. शाहरुख खानने पठाणच्या प्रदर्शनापूर्वीच निर्णय घेतला होता की तो या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. मात्र, आता हा चित्रपट सुपरहिट झाल्याने या आनंदाच्या निमित्ताने 'पठाण' चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी, अँकरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुखने होय मी अरोगन्ट आहे, असे म्हणत आत्मविश्वास असायलाच हवा, असे म्हटले.
असं नाही की मी अॅरोगन्ट नाही, या गैरसमजात राहूच नका. आय एम द बेस्ट.. आय एम द बेस्ट... आय एम द बेस्ट... असं म्हणत शाहरुख खानने स्वत:बद्दल आत्मविश्वास बाळगण्याचा सल्ला सर्वांनाच दिला. सकाळी उठताना हाच विचार घेऊन आपण झोपेतून उठायला हवं की, आपण बेस्ट आहोत. तर, कुठेतरी आपण गुड किंव बेटर बनू शकतो. जर, आपण चंद्रावर जाण्याची झेप घेतली नाही, तर आपण १० व्या किंवा २० व्या मजल्यापर्यंतही पोहोचू शकणार नाही. म्हणूनच, सकाळी उठताना प्रत्येकाने हा आत्मविश्वास बाळगायला हवा की आय एम द बेस्ट आणि आय वील डू बेस्ट.
पठाणबद्दल बोलायचं झालं तर आमच्या संपूर्ण टीमनेच खूप मेहनत घेतली. त्यामुळेच, या चित्रपटाचं काम दडपण न येता सहजपणे पूर्ण झालं. कोविडच्या काळात या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती, अशी आठवणही शाहरुखने सांगितली. दरम्यान, या पत्रकार परिषदेला शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही उपस्थित होते.
पठाण सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील पठाण हा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात पठाणबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या 5 दिवसांत 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजुनही चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने वाढ होत असून लवकरच हा चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.