बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या हिट चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास ‘अग्निपथ’ या चित्रपटाचे नाव त्याच्या ‘टॉप 5 लिस्ट’मध्ये येईल. कदाचित याचमुळे ७ वर्षांनंतरही हृतिक रोशन या चित्रपटातील आपली भूमिका विसरू शकला नाही. ‘अग्निपथ’मध्ये हृतिक लीड रोलमध्ये होता. यातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.२०१२ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’चा रिमेक व्हर्जन असलेल्या हृतिकच्या या चित्रपटाला काल २६ जानेवारीला ७ वर्षे पूर्ण झालीत. साहजिकच हृतिक काहीसा भावूक झाला. ‘अग्निपथ’ला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने एक व्हिडीओ शेअर केला.
या व्हिडिओत हृतिक हरिवंश राय बच्चन यांची कविता वाचून दाखवतोय. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडिओसोबतचे कॅप्शनही लक्षवेधी आहे. ‘अग्निपथ हा चित्रपट माझ्यासाठी कुठल्या मोठ्या भेटीपेक्षा कमी नव्हता. अभिनेत्याला जोखिम पत्करायला लावणाºया फार कमी स्क्रिप्ट असतात. यात अभिनेत्यांची हाडे तुटण्याचीही जोखीम असते. त्याकाळात मी अशाच एका भूमिकेच्या शोधात होतो. खरे तर मी कमालीचा आळशी व्यक्ती. पण स्पेनमध्ये ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चे शूटींग करत असताना करण जोहरने करण मल्होत्राला माझ्याकडे पाठवले. त्यावेळी एका महान चित्रपटाचा रिमेक बनवण्याची कल्पना मला जराही मान्य नव्हती. पण मी चित्रपटाची कथा ऐकली आणि त्याला नकार देऊ शकलो नाही. यानंतरचा सगळा इतिहास तर तुम्हाला ठाऊक आहेच. मला आजही ती कविता वाचताना आनंद वाटतो...,’ असे हृतिकने लिहिले आहे.लवकरच हृतिक रोशन ‘सुपर 30’ या चित्रपटात दिसणार आहे. आधी हा चित्रपट गत २५ जानेवारीला रिलीज होणार होता. पण अचानक या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली.