Join us

‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक! - आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 1:20 PM

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट आगामी ‘राझी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. रोमांचक कथा असलेल्या या सिनेमात आलिया एका हुशार ...

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट आगामी ‘राझी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. रोमांचक कथा असलेल्या या सिनेमात आलिया एका हुशार आणि देशाभिमानी तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघना गुलजार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विनीत जैन, करण जोहर, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील तिचा लूक लाँच झाल्यापासूनच सर्वत्र तिच्या व्यक्तिरेखेविषयी चर्चा सुरू झाली होती.  ११ मे रोजी ‘राझी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाविषयी आणि एकंदरच तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरविषयी जान्हवी सामंत यांनी तिच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.  * ‘राझी’चित्रपटातील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय सांगशील? व्यक्तिरेखेला समजून घेण्यासाठी तू काय मेहनत घेतलीस?- या चित्रपटात मी ‘सहमत’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही भूमिका साकारण्यापूर्वी मी दिग्दर्शक मेघना गुलजार हिच्यासोबत बसून स्क्रिप्ट वाचली, भूमिका समजून घेतली, मी माझ्या हिंदीवर थोडंसं लक्ष दिलं कारण माझी हिंदी ही एकदम बॉम्बे स्टाईलची आहे. चित्रपटात मी १९७१ च्या दशकातील हिंदी बोलणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर जुन्या काळातील अभिनेत्रींची अदा, साधेपणा, त्यांचे राहणीमान, त्यांच्या बोलण्याची लकब, त्यांचा वावर या सर्व गोष्टी शिकण्यासाठी मी ‘कभी कभी’, ‘सिलसिला’,‘उमरावजान’ हे चित्रपट पाहिले. याशिवाय बऱ्याच तांत्रिक गोष्टी असतात ज्यांवर आम्हा कलाकारांना मेहनत घ्यावी लागते.* या चित्रपटातील तुझ्या ‘सहमत’ या व्यक्तिरेखेतील कोणती बाब आवडली? - सहमत ही एक देशाभिमानी मुलगी असते. गुप्तहेर असूनही ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात कुठलाच बदल करत नाही, ही तिची बाब मला प्रचंड आवडली. मी सहमत साकारत असताना तिच्यासोबत खूप एकरूप झाले होते. सत्य घटनेवर आधारित चित्रपटात काम करणं अत्यंत कठीण असतं. कधी कधी तर असं व्हायचं की, मी एखाद्या सीनमध्ये रडत असायचे. सीन संपला तरी पण माझं रडणं थांबायचंच नाही. कुठेतरी तिच्या मनातील भाव माझ्याही मनाला भिडायचे आणि हीच बाब माझ्यासाठी खुप वेदनादायी होती. ‘राझी’तील सहमत माझ्यासाठी आत्तापर्यंतच्या व्यक्तिरेखांमधून सर्वांत आव्हानात्मक भूमिका होती.* ‘उडता पंजाब’मध्ये तू काम केलं आहेस. त्यानंतर बऱ्याच भूमिका केल्या आहेस. काही वर्षांनंतर आता काय वाटते की, अभिनय अजून चांगला होऊ शकला असता का? - नाही. कारण मी प्रत्येक भूमिकेसाठी कायम जीव ओतून काम करते. एक कलाकार म्हणून मी ‘मुव्ह आॅन’ करायला शिकले आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण शिकत जातो. ‘उडता पंजाब’ माझ्या करिअरसाठी टर्निंग पॉर्इंट ठरला. मी खूप काही शिकले आहे, अजून बरंच काही शिकायचे आहे.* एक कलाकार म्हणून तू तुझ्या भूमिकेशी एकरूप कशी होतेस? - नाही असं काही होत नाही. मी कॅमेऱ्यासमोर उभी राहते आणि कल्पना करते की, मी या घटनेत असले असते तर काय केलं असतं. मी माझ्या अभिनयाशी प्रामाणिक राहून शंभर टक्के  देण्याचा प्रयत्न करते. * महिला दिग्दर्शिकेसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? - असं काही नसतं. पुरूष आणि महिला दिग्दर्शक असा काही भेदभाव नसतो. आम्ही एका व्यक्तीसोबत काम करतो. मेघना गुलजार एक खुप टॅलेंटेड दिग्दर्शिका आहे. तिच्यासोबत काम करताना खुप शिकायला मिळतं. मी अनेकदा तिच्यासोबत सेटवर भांडायचे देखील. पण, ती सेटवर बॉस असायची आणि कामाच्यावेळी तिचं ऐकणं हे आमचं कर्तव्य असतं. यापुढेही तिच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.* तू भूमिकांची निवड कशी करतेस?- मी माझ्या मनाला पटेल त्या भूमिका स्विकारते. माझ्या निर्णयावर कुणाचंही दडपण असत नाही. तो सर्वस्वी माझा निर्णय असतो. स्क्रिप्ट वाचून मी ठरवते की, त्यात मला अभिनयासाठी किती स्कोप आहे? भूमिका किती आव्हानात्मक आहे? या सर्वांचा विचार करूनच मी निर्णय घेते.* तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?- सध्या मी ‘कलंक’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ या दोन बिगबजेट चित्रपटांवर काम करत आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक माझे खुप चांगले मित्र आहेत. खुप मजा येते. दोन्ही चित्रपटांच्या कथा अत्यंत सुंदर आहेत. मी चित्रपट प्रेक्षकांसमोर केव्हा येणार यासाठी उत्सुक आहे. * दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- अयान माझा मित्रच आहे. त्याच्यात खुप एनर्जी आहे. मला त्याच्यासोबत काम करायला प्रचंड आवडतं. याशिवाय रणबीर कपूरसोबत मी प्रथमच काम केलं असून त्याच्यासोबत काम करताना मी प्रचंड कम्फर्टेबल होते.