बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टीचा ( Sunil Shetty ) लाडका लेक अहान शेट्टीचा (Ahan Shetty) ‘तडप’ ( Tadap) येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. ‘तडप’चा ट्रेलर पाहून सगळेच अहानच्या प्रेमात पडलेत, पण अण्णाच्या लेकाची खरी परीक्षा शुक्रवारी आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढचं सगळं अवलंबून असेल. पहिला चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर ‘प्रेशर’ असणारच. पण अहान ‘नर्व्हस’ मुळीच नाही. कारण त्याचा बाबा त्याच्यासोबत आहे.
होय, ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अहान त्याच्या डेब्यूबद्दल बोलला. तुझा पहिला सिनेमा रिलीज होतोय, तू नर्व्हस आहेस का? असा प्रश्न अहानला केला गेला. यावर अहान भरभरून बोलला. तो म्हणाला, ‘प्रेशर तर आहेच, पण मी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. फ्रायडेला कधीच घाबरू नकोस, असे माझे बाबा मला सतत सांगतात. तुझा सिनेमा चालला नाही तरी त्याचं ओझं मनावर घेऊन पुढचा प्रवास करू नकोस. चांगला अभिनेता झाला नाहीस तरी चालेल, पण चांगला माणूस बन, असं बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत. मी त्यानुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटांबद्दल माझे बाबा मला अजिबात सल्ला देत नाही. तुझे निर्णय तू घे आणि चुकांमधून शिक, असं ते मला म्हणतात.’
अभिनेता बनण्यासाठी तू काय तयारी केलीस? असं विचारलं असता अहान म्हणाला, लहान असताना बाबासोबत त्यांच्या सेटवर जायचो. तिथे मी शिकत होतो, पण फार लक्ष मात्र द्यायचो नाही. सेटवर क्रिकेट खेळणं, मज्जा मस्ती करणं हेच मी करायचो. कारण मला अॅक्टर बनायचं नव्हतं तर आर्मीत जायचं होतं. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स १००’चा हिंदी रिमेक आहे. यात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.