बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करत आहेत. पण एक काळ असा होता की कमी बजेट असलेले चित्रपटही जोरदार कमाई करत असत. असाच एक सिनेमा आहे, जो बनला तर अत्यंत कमी पैशात मात्र जेव्हा प्रदर्शित होताच त्या सिनेमाने छप्परफाड कमाई केली होती. या चित्रपटात एकच अभिनेत्री तर दोन अभिनेते होते आणि तिघांच्याही कारकिर्दीतील हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला.
सुभाष घई लिखित आणि दिग्दर्शित केलेला तो सिनेमा म्हणजे 'ताल'. या चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. तर अमरीश पुरी आणि आलोक नाथ सहाय्यक भूमिकेत पाहायला मिळाले. जेव्हा ताल हिंदीमध्ये सुपरहिट झाला, तेव्हा तो तामिळमध्ये 'थलम' म्हणून डब झाला होता. हा सिनेमा पॅन इंडिया रिलीज झाला नव्हता. पण, केवळ हिंदी भाषेतच सिनेमानं आश्चर्यकारक व्यवसाय केला होता.
'ताल' हा सिनेमा केवळ 11 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. तर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 51 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. खुद्द दिग्दर्शकालाही या चित्रपटाला इतके यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती. चित्रपटात ऐश्वर्या रायने आलोक नाथ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. जिच्या प्रेमात अनिल कपूर आणि अक्षय खन्ना पडतात. ऐश्वर्या रायला या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर तिला डझनभर ऑफर्स मिळू लागल्या होत्या.
ऐवढचं नाही तर 45 व्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुभाष घई, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या रायला पुरस्कार मिळाला होता. तर अनिल कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि एआर रहमानला सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि आनंद बक्षीला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
'