बॉलिवूडमध्ये एकत्र काम करता करता अनेक कलाकारांच्या जोड्या जमल्या आहेत. यात अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय, दीपिका पदूकोण-रणवीर सिंग, कतरीना कैफ-विक्की कौशल्य, आलिया भट-रणवीर कपूर, कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांचा समावेश आहे. हे सर्व कपल्स बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले आहेत. लग्नानंतरही हे कपल्स चित्रपटात भूमिका साकारताना दिसत आहेत. पण यातही सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन. (Aishwarya Rai-Abhishek Bachchan)
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांनी काही चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रीकरण सुरु असताना दोघांचे सूर जुळले. २००७च्या जानेवारी महिन्यात या जोडीने गुपचूप साखरपुडा केला आणि २० एप्रिल २००७ रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा शाही विवाह सोहळा मुंबईतील प्रतिक्षा बंगल्यात पार पडला. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले होते. त्यानंतर 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' या गाण्याचे शूटींग सुरु असताना दोघांचे सूत जुळले. 'गुरु' चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील प्रेम चांगलेच बहरले.
अभिषेकचा जुना फोटो होतोय व्हायरल
दरम्यान आता अभिषेक बच्चनचा एक जुना फोटो व्हायरल होतोय. हा फोटो १९९४ मधला असल्याचे सांगितले जात आहे. याच वर्षात ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली होती. त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या फोटोत अभिषेक त्याचे वडिल आणि बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन अगदी साध्या पेहरावात दिसत आहे.
त्याचवेळी ऐश्वर्याचा मिस वर्ल्ड दरम्याचा फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत ऐश्वर्याच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज आहे. मिस वर्ल्डच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावले. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर १९९७ साली ऐश्वर्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने मणिरत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत प्रकाश राज, तब्ब, रेवती आणि कल्पना अय्यर हे कलाकार होते.