बच्चन कुटुंब सध्या प्रसिद्धीझोतात आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील दुरावा हे त्यामागचं कारण आहे. सध्या ऐश्वर्या आणि आराध्यासोबत अभिषेक कुठेच दिसून येत नाही. अगदी आराध्याच्या वाढदिवसालाही तो आला नाही. तर आता ऐश्वर्याच्या भावजयीच्या सोशल मीडियावरील एका कमेंटनेही लक्ष वेधून घेतलंय. नक्की काय प्रकरण आहे वाचा.
ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai Bachchan) भावजय श्रीमा राय (Shrima Rai) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती एक बिझनेसवुमन आहे आणि ऐश्वर्यासारखीच दिसायला सुंदर आहे. श्रीमाने काही दिवसांपूर्वी एका पोस्टवर कमेंट केली होती ज्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. श्रीमाने नवरा, सासू आणि मुलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. यावर एका युझरने कमेंट करत लिहिले, 'ही कधीच ऐश्वर्या किंवा आराध्यासोबत फोटो शेअर करत नाही'. या कमेंटवर श्रीमाने उत्तर देत लिहिले, 'ऐश्वर्याचे सगळे फोटो पाहण्यासाठी तुम्ही तिच्या इन्स्टाग्रामवर जाऊ शकता. तिथे तुम्हाला केवळ तिचेच फोटो दिसतील आणि आमचे एकही दिसणार नाहीत. हे पाहून तुमचं समाधान होईल.'
शिवाय तिची महिन्याभरापूर्वीचीही एक पोस्ट आहे ज्यामध्ये तिने प्रियंका चोप्रासोबत फोटो शेअर केला आहे. यातही एका युझरने कमेंट करत लिहिले, 'तू कधीच ऐश्वर्यासोबत का दिसत नाही. ना ऐश्वर्याचं कुटुंब आणि ना बच्चन कुटुंब तिला सामावून घेतं. असं का? यावर श्रीमाने क्रिप्टिक कमेंट करत लिहिले, 'तुम्हीच विचार करा'.
श्रीमाच्या पोस्टवरील हा स्क्रीनशॉट खूप जुना आहे पण आता लोकांचं त्याकडे लक्ष गेलं आहे. श्रीमाने तिच्या कमेंट्समधून ऐश्वर्यावरच निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. ऐश्वर्याच्या अकाऊंटवर अनेकदा तिचे, आराध्याचे आणि आईचेच फोटो असतात. बऱ्याच काळापासून तिने अभिषेकसोबतही फोटो पोस्ट केलेला नाही. मात्र ऐश्वर्या अजूनही इन्स्टाग्रामवर फक्त एकालाच फॉलो करते तो म्हणजे अभिषेक.