68th National Film Awards : यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पुरस्कार जाहिर करण्यात आले. यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने आपलं नाव कोरलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि साऊथ सुपरस्टार सूर्या यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर झाला आहे. अजय देवगणाला तिसऱ्यांदा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट जाहिर झाला आहे. अजय देवगणला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ तर सूर्याला ‘सुरूराई पोटू’ या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा अॅवॉर्ड विभागून देण्यात येणार आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “तान्हाजी-द अनसंग वॉरिअरचा निर्माता या नात्याने, चित्रपटाला ६८व्या राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्याने मला प्रचंड आनंद होतो आहे. तान्हाजी हा एक परिपूर्ण चित्रपट आहे. मैत्री, निष्ठा, कौटुंबिक मूल्ये आणि त्यागाची ही एक गोष्ट आहे. या पुरस्कारावर माझा दिग्दर्शक ओम राऊत, माझे सहनिर्माते, टी-सिरीज आणि माझे सहकलाकार यांचाही माझ्या इतकाच हक्क आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या क्रिएटिव्ह टीमचे आभार मानतो ज्यांनी हा सिनेमा सुपरहिट बनवला.
10 जानेवारी 2020 रोजी तान्हाजी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने 368 कोटींची कमाई केली होती. तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा यातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली. मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.