OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 09:41 AM2019-05-13T09:41:43+5:302019-05-13T09:47:09+5:30
अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती.
अजय देवगण हा खऱ्या आयुष्यात अतिशय शांत असल्याचे मानले जाते. पण त्याला राग आला की, त्याला आवरणे देखील कठीण असते. असेच काहीसे त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवर घडले होते. अजय डेव्हिड धवन यांच्या चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे त्याला इतका राग आला होता की, डेव्हिड धवन यांना मारण्यासाठी त्याने हॉकी स्टिक घेतली होती.
डेव्हिड धवन यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डेव्हिड धवन काम करताना खूपच धमाल मस्ती करतात. ते सेटवर देखील कलाकारांची टर उडवत असतात. पण कधीकधी ते मस्करी करता करता कलाकारांचे काही चुकत असेल तर त्याबद्दल त्यांना सुनावतात. २००२ मध्ये हम किसी से कम नही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. या चित्रपटाच्या सेटवर अजय आणि डेव्हिड यांच्यात वाद झाला होता.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटासाठी संजय, अजय देवगण चित्रीकरण करत होते. ते चित्रीत करत असलेले दृश्य खूपच कठीण होते. हा सीन करताना अजय देवगण सतत रिटेक घेत होता. त्यामुळे डेव्हिड धवन प्रचंड चिडले होते. त्यामुळे त्यांनी मस्करीतच अजयला शिवी दिली. डेव्हिड धवन यांनी मस्करीत ही गोष्ट केली असली तरी अजयला त्याचा प्रचंड राग आला आणि त्याच्या हातात असलेली हॉकी स्टीक घेऊन तो त्यांच्यावर धावला. त्याचा हा आवेश पाहाताच संजय दत्तने त्याला अडवले.
अजयचा हा अवतार पाहून डेव्हिड धवन खूपच घाबरले होते. त्यांनी अजयला इतके चिडलेले कधीच पाहिले नव्हते. डेव्हिड इतके घाबरले होते की, ते संजयच्या मागे लपले. या दरम्यान संजयने अजयच्या हातून हॉकी स्टीक घेतली आणि त्याला शांत केले. शिवी दिल्याबद्दल डेव्हिडने अजयची माफी मागितली. अजयने देखील मोठ्या मनाने त्यांना माफ केले. त्यानंतर ही भांडणं विसरून ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड बनले.