प्रेक्षकांचा आवडता स्टार अजय देवगण (Ajay Devgn)याने 1991 साली बॉलिवूड डेब्यू केला होता. एकाचवेळी दोन चालत्या बाईक्सवर दोन पाय ठेऊन उभा राहात एन्ट्री करणारा हा हिरो कोण म्हणून त्याची तेव्हा जाम चर्चा झाली होती. चेहरा तसा सर्वसामान्य होता. पण प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले. गेल्या 30 वर्षांत अभिनयाची एकेक शिखरं पादक्रांत करत अजयने प्रेक्षकांची मनं जिंकली. एकाच भूमिकेत अडकून न पडता अगदी अॅक्शनपटापासून तर कॉमेडीपर्यंत सर्व प्रकारच्या सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आजही त्याचा पहिला सिनेमा ‘फूल और कांटे’ (Phool Aur Kaante) प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्याचा एन्ट्री सीन तर विसरणं शक्यचं नाही. हा एन्ट्री सीन करतानाचा अनुभव अजयने इतक्या वर्षानंतर शेअर केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला.
मी हिरो बनण्याचं स्वप्न माझ्या बाबांचं होतं...हिरो होण्याचं स्वप्नं मी पाहिलं नव्हतं. खरं तर हे माझ्या बाबांचं स्वप्नं होतं. मी फक्त त्यांचं स्वप्नं साकार केलं. स्टारडम, यश हे काही सहजासहजी मिळतं नाही. त्यामागे मोठी मेहनत असते. फूल और कांटे रिलीज झाला आणि स्टारडम काय असतं हे मला कळलं, असं तो म्हणाला.
तो वेडेपणा होता... ‘फूल और कांटे’ त्या एन्ट्री सीनबद्दल माझ्या मनात नेमक्या काय भावना होत्या, हे मला तसं फारसं आठवत नाही. पण हो, दोन बाईक्सवर उभं राहून एन्ट्री घेणं हा चक्क वेडेपणा होता. हा सीन करताना मी कमालीचा नर्व्हस होतो. माझ्या पोटात गुडगुड सुरू होती. आजही असा काही सीन असला की माझी हीच अवस्था असते. तेव्हा बॉडी डबल नसायचे. अॅक्टरला सर्व सीन स्वत: शूट करावे लागायचे. पण माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता. म्हणूनच तो सीन शूट होऊ शकला. माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने माझ्याकडून अॅक्शन सीन्स शूट करून घेतले, ते करून मी प्रचंड थकून जायचो. ते ‘फूल और कांटे’चे अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी माझ्यासाठी कठीण अॅक्शन सीन्स कोरिओग्राफ केले होते. मी ते करू शकेल, हा विश्वास त्यांना होता, असं अजय म्हणाला.